भूमाफिया बोडखे अखेर अटकेत
By Admin | Updated: October 9, 2014 00:50 IST2014-10-09T00:40:34+5:302014-10-09T00:50:38+5:30
औरंगाबाद : बनावट कागदपत्रे बनवून जमीन बळकाविण्याचे अनेक गुन्हे दाखल असलेला भूमाफिया प्रकाश रामराव बोडखेला (रा. उल्कानगरी) बुधवारी गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली.

भूमाफिया बोडखे अखेर अटकेत
औरंगाबाद : बनावट कागदपत्रे बनवून जमीन बळकाविण्याचे अनेक गुन्हे दाखल असलेला भूमाफिया प्रकाश रामराव बोडखेला (रा. उल्कानगरी) बुधवारी गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली. शहरातील प्रख्यात मनोचिकित्सक डॉ. कादरी यांची जमीन हाडपल्यानंतर त्यांच्याकडे दहा लाखांची खंडणी मागितल्याच्या गुन्ह्यात तो गेल्या सहा महिन्यांपासून पोलिसांना हवा होता.
प्रकाश बोडखेविरुद्ध जमिनीची बनावट कागदपत्रे तयार करून जमिनी हडपणे, जमिनीच्या व्यवहारात नागरिकांची फसवणूक करणे, अशा स्वरूपाने अनेक गुन्हे छावणी, जवाहरनगर, मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात दाखल आहेत. मार्च महिन्यात छावणी पोलीस ठाण्यातही बोडखे व त्याच्या टोळीविरुद्ध डॉ. अजीज कादरी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आला होता. डॉ. कादरी यांच्या सातारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका जमिनीचे बोखडे आणि त्याच्या टोळीने बोगस कागदपत्रे तयार केली. नंतर त्या जमिनीवर ताबा घेतला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर कादरी यांनी विरोध केला असता त्यांच्याविरुद्ध बोडखे व त्याच्या साथीदारांनी विनयभंगाची एक खोटी तक्रार दाखल करायला लावली. नंतर ही तक्रार मागे घेण्यासाठी व जमिनीची सेटलमेंट करण्यासाठी दहा लाखाची खंडणी मागितली होती. बोखडे आणि त्याच्या टोळीला वैतागलेल्या डॉ. कादरी यांनी छावणी ठाण्यात फिर्याद दिली.
अटक टाळण्यासाठी बोडखे याने न्यायालयाचे दार ठोठावले होते. मात्र, त्याला जामीन मिळाला नव्हता. त्यामुळे तो पोलिसांना चकमा देत फिरत होता. तो घरी आल्याची माहिती बुधवारी गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांना खबऱ्याकडून मिळाली. आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार सुभाष खंडागळे, सहायक फौजदार गौतम गंगावणे, द्वारकादास भांगे, गोकुळ वाघ, रामदास गाडेकर, विलास कुलकर्णी, प्रकाश काळे, विलास काळे, किशोर काळे यांनी त्वरित जाऊन त्याच्या उल्कानगरीतील घरावर छापा मारला. तेथे तो सापडला. त्याला अटक करण्यात आली.
बारा जणांना अटक
या गुन्ह्यात आतापर्यंत विशाल एडके (रा. पदमपुरा), आग्याकारसिंग बिंद्रा, गौतम पगारे (रा. जटवाडा रोड), शेख रजिओद्दीन निजाम (रा. बिसमिल्ला कॉलनी), मोहंमद नजिरोद्दीन (रा. आसेफिया कॉलनी), शेख सादिक (रा. बुढ्ढीलेन), अब्दूल रहीम (रा. राहत कॉलनी), रवींद्र धुमाळ (रा. बालाजीनगर), अनिल सदाशिवे (रा. रमानगर), लक्ष्मीबाई चव्हाण (रा. देवळाई चौक), रावसाहेब गायकवाड (रा. विटखेडा) व इंद्रजितसिंग या १२ आरोपींना अटक करण्यात आली होती. आरोपी बोडखे हा या टोळीचा सूत्रधार असल्याचे तपासात समोर आले होते.