‘भंगारा’वरून भिडले
By Admin | Updated: March 1, 2016 00:29 IST2016-03-01T00:29:16+5:302016-03-01T00:29:16+5:30
औरंगाबाद : रेल्वेस्टेशन रस्त्यावरील पथदिव्यांच्या जुन्या खांबांवरून सोमवारी उपमहापौर प्रमोद राठोड आणि एमआयएम नगरसेवकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली.

‘भंगारा’वरून भिडले
औरंगाबाद : रेल्वेस्टेशन रस्त्यावरील पथदिव्यांच्या जुन्या खांबांवरून सोमवारी उपमहापौर प्रमोद राठोड आणि एमआयएम नगरसेवकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्या दालनातच हा प्रकार घडला. शेवटी बकोरिया यांनीच मध्यस्थी केल्यानंतर हा वाद शमला.
शुक्रवारी भाजपचे शिष्टमंडळ आयुक्तांना भेटले. चर्चेदरम्यान उपमहापौर प्रमोद राठोड यांनी रेल्वेस्टेशन रस्त्यावरील जुन्या खांबांचा विषय उपस्थित केला. या रस्त्यावर नुकतेच पथदिव्यांचे नवीन खांब बसविण्यात आले आहेत; परंतु तेथून काढलेले आधीचे सुमारे ६० खांब गायब आहेत, स्टॉक रजिस्टरलाही त्याच्या नोंदी नाहीत, असे राठोड म्हणाले.
हा विषय सुरू असतानाच एमआयएमचे नगरसेवक फेरोज खान तसेच नगरसेविका सरिता बोर्डे यांचे पती अरुण बोर्डे आदी इतर काही जण आयुक्तांच्या दालनात आले. त्यांनी राठोड यांच्या बोलण्यावर आक्षेप घेत तुम्ही आयुक्तांना चुकीचे फीडिंग करीत आहात असा आरोप केला. त्यावर राठोड यांनी मी तुमच्याशी बोलत नाही, भंगारात काढलेले खांब कुठे गेले याचा प्रशासनाला जाब विचारत असल्याचे म्हटले़ तसेच फेरोज खान यांना गप्प बसविण्याचा सल्ला दिला. हा वाद आणखीनच वाढला. दोन्ही बाजूंनी एकमेकांना उद्देशून जोरजोराने बोलण्यास सुरुवात झाली. प्रकरण अधिकच चिघळत असल्याचे पाहून शेवटी बकोरिया यांनीच मध्यस्थी करीत वाद मिटविला.
खांबांच्या नोंदीच नाहीत...
मनपाच्या वतीने काही दिवसांपूर्वीच रेल्वेस्टेशन रस्त्यावरील जुने खांब काढून घेण्यात आले; परंतु हे जुने खांब कुठे गेले याची नोंद पालिकेकडे नाही. मनपाच्या विद्युत विभागाने स्टॉक रजिस्टरमध्ये त्याच्या नोंदी घेतलेल्या नाहीत. मात्र हे खांब गायब झालेले नसून ते व्यवस्थित ठेवण्यात आलेले आहेत, असे आयुक्तांनी सांगितले.