छोट्या पंढरीत भक्तिसागर
By Admin | Updated: July 10, 2014 01:16 IST2014-07-10T01:12:10+5:302014-07-10T01:16:30+5:30
वाळूज महानगर : टाळ -मृदंगाचा गजर, विविध भजने म्हणत विठ्ठलाच्या दर्शनासाठी आज जवळपास ५ लाख भाविकांचा जनसागर छोट्या पंढरपुरात जमला होता.

छोट्या पंढरीत भक्तिसागर
वाळूज महानगर : टाळ -मृदंगाचा गजर, विविध भजने म्हणत विठ्ठलाच्या दर्शनासाठी आज जवळपास ५ लाख भाविकांचा जनसागर छोट्या पंढरपुरात जमला होता. पावली खेळत तसेच विठ्ठलनामाचा जयघोष करीत भाविक व वारकऱ्यांच्या गर्दीने रस्ते फुलले होते.
येथील विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात मंगळवारच्या मध्यरात्री १२ वाजून १ मिनिटांनी औरंगाबाद पंचायत समितीचे उपसभापती सर्जेराव पा.चव्हाण व त्यांच्या पत्नी रंजना यांच्या हस्ते विठ्ठलाचा महाअभिषेक व पूजा करण्यात आली. त्यानंतर मनपा स्थायी समितीचे सभापती विजय वाकचौरे यांनी सपत्नीकआरती केली. रात्री १ वाजता मंदिराचे दार भाविकांसाठी उघडण्यात आले. औरंगाबादसह परिसरातून वारकरी व भाविकांचे जथे, दिंड्या भजन, कीर्तन, रिंगण खेळत येथे येत होते. महिला व पुरुषांना सहजपणे दर्शन घेता यावे यासाठी लोखंडी व लाकडी बॅरिकेटस् उभारण्यात आले होते. पायी येणाऱ्या दिंड्यातील वारकऱ्यांच्या दर्शनाची विशेष व्यवस्था करण्यात आली होती.
यावेळी तिरंगा चौकापासून मंदिरापर्यंत दर्शनासाठी भाविकांच्या रांगा होत्या.
मंदिर परिसरात महिला भाविकांनी फुगड्यांचा आनंद लुटला. रात्री उशिरापर्यंत मंदिरात जिल्ह्यातील भाविकांनी व जवळपास १२५ दिंड्यांनी गर्दी केली होती.
यात्रेसाठी ट्रस्टचे अध्यक्ष रत्नाकर पा.शिंदे, पुजारी ह.भ.प. पांडुरंग महाराज कुलकर्णी, ह.भ.प. श्रीराम महाराज कुलकर्णी, तान्हाजी महाराज शेरकर, भिकाजी खोतकर, विठ्ठलराव वाकळे, बाबूराव झळके, मोहन चव्हाण, बाळासाहेब राऊत, विष्णू झळके, हरिभाऊ शेळके, लता कानडे, प्रकाश झळके, देवराव मातकर, रामनाथ पवार, राधाकिसन नवले, पंचायत समिती सदस्य गणेश नवले, सरपंच लक्ष्मीबाई कोरडकर आदींनी परिश्रम घेतले.
मुलगी जखमी
यात्रेत खोजेवाडी येथील दिंडीत आलेल्या महिलेचे मंगळसूत्र कापण्यासाठी चोरट्याने ब्लेड वापरले. त्यात तिची मुलगी पूजा नंदू शिंदे (८) जखमी झाली. तिच्या पालकांनी तिला रुग्णालयात दाखल केले.
गर्दीत यू.ए. पवार या महिलेच्या बॅगमधील पर्स चोरीस गेली. त्यात रोख १ हजार रुपये, आधार कार्ड, ओळखपत्र होते. सुरक्षितता म्हणून १४ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून, ४ कॅमेरे मंदिरात तर १० कॅमेरे मंदिर परिसरात आहेत. तरीही या अप्रिय घटना घडल्या.