बाजारसावंगी ते जैतखेडा कन्नड रस्त्यावर या भागातील नागरिकांची दररोज मोठ्या प्रमाणात ये-जा असते. कन्नड आगाराच्या कन्नड फुलंब्रीमार्गे बाजारसावंगी या मार्गावर बसेस धावत असतात. पिशोर, भारंबा तांडा, वडाळी या भागातील नागरिक बाजार सावंगी व फुलंब्री येथे येण्यासाठी याच रस्त्याचा वापर करतात. पुलाच्या मधोमध गेल्या सहा महिन्यांपासून भलामोठा खड्डा पडला आहे. या भागातील नागरिकांनी वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हा खड्डा दुरुस्तीसाठी मागणी केली. मात्र, त्यांनी याकडे पूर्णत: दुर्लक्ष केले आहे. या खड्ड्यामुळे रात्री प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.
फोटो : वडगांव ते जैतखेडा रस्त्याच्या पुलावर गेल्या सहा महिन्यांपासून पडलेले भगदाड.