‘चोरट्यांपासून सावध रहाऽऽऽ’

By Admin | Updated: August 8, 2016 00:40 IST2016-08-08T00:36:22+5:302016-08-08T00:40:37+5:30

उस्मानाबाद : शहरातील रविवारच्या आठवडी बाजारातील वाढलेल्या चोऱ्या रोखण्यासाठी शहर पोलिसांनी आता नामी शक्कल काढली आहे़

"Beware of the Thieves" | ‘चोरट्यांपासून सावध रहाऽऽऽ’

‘चोरट्यांपासून सावध रहाऽऽऽ’


उस्मानाबाद : शहरातील रविवारच्या आठवडी बाजारातील वाढलेल्या चोऱ्या रोखण्यासाठी शहर पोलिसांनी आता नामी शक्कल काढली आहे़ पोलीस बंदोबस्त वाढविण्यासह ‘स्पिकार’द्वारे चोरट्यांपासून सावध रहाण्याच्या सूचना दिवसभर नागरिकांना देण्यात येत आहेत़ पोलीस कर्मचारी रविवारच्या आठवडी बाजारात दिवसभर ‘अलाऊंसिंग’ केले़ या उपक्रमामुळे नागरिकांमध्येही जनजागृती होत आहे़
शहरासह परिसरातील वाढलेल्या चोऱ्यांमुळे सर्वसामान्यांची झोप उडाली असून, पोलिसांचीही मोठी कसरत सुरू आहे़ त्यातच आठवडी बाजारातून मोबाईल चोरून नेणाऱ्या चोरट्यांनी मागील काही महिन्यांपासून मोठा धुमाकूळ घातला आहे़ आठवडी बाजारातून मोबाईल चोरीला जात असल्याने शहर पोलिसांबरोबरच स्थानिक गुन्हे शाखेचे पथकही प्रत्येक आठवडी बाजारात गस्त घालीत आहे़ मात्र, गस्तीवरील पोलिसांच्या हातावर तुरी देवून चोरट्यांनी मोबाईल चोरीचा सिलसिला सुरू ठेवला होता़ या मोबाईल चोरांना आवर घालण्यासाठी आता आठवडी बाजारातील बंदोबस्त वाढविला आहे़
शहर पोलीस ठाण्याचे ‘डीबी’ पथक, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, चार्लि, लिमा पथकातील कर्मचाऱ्यांनी रविवारी दिवसभर आठवडी बाजार व परिसरात गस्त घातली़ तर या रविवारच्या आठवडी बाजारात पोलिसांनी थेट ‘स्पिकर’द्वारे सर्वसामान्य नागरिकांची जनजागृती केली़ रविवारी सकाळी शहर ठाण्याचे पोनि डी़एम़शेख यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले़ यावेळी स्थागुशाचे पोनि आवटे, शहर ठाण्याचे पोनि जाधव, फौजदार जाधव आद यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते़ आठवडी बाजारात येणाऱ्या नागरिकांचे स्वागत करून ‘स्वत:कडील पर्स, दागिने, मोबाईल, मौल्यवान वस्तू संभाळा, बेवारस वस्तू आढळल्यास पोलिसांशी संपर्क साधा’ अशा विविध सूचना देवून जनजागृती केली़ (वार्ताहर)

Web Title: "Beware of the Thieves"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.