सावधान ! स्वस्तात मालमत्ता घ्याल, तर होईल घोर फसवणूक; खरेदीपूर्वी अशी करा खात्री
By मुजीब देवणीकर | Updated: August 14, 2025 17:30 IST2025-08-14T17:20:07+5:302025-08-14T17:30:02+5:30
मुख्य रस्ते, आरक्षित जागांवरील मालमत्ता विकण्याचा सपाटा

सावधान ! स्वस्तात मालमत्ता घ्याल, तर होईल घोर फसवणूक; खरेदीपूर्वी अशी करा खात्री
छत्रपती संभाजीनगर : शहरात सध्या महापालिकेकडून रस्ता रुंदीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत मुख्य रस्त्यांवरील हजारो मालमत्ता बाधित होत आहेत. काही मालमत्ताधारकांनी अव्वाच्या सव्वा दराने मालमत्ता विक्रीला काढल्या आहेत. रस्त्यांमुळे मालमत्तेचा काही भाग बाधित हाेणार हे विक्री करताना कोणीही सांगायला तयार नाही ! घर, दुकान, खुले प्लॉट स्वस्तात मिळत असल्याचे पाहून अनेक नागरिक व्यवहार सुद्धा करीत आहेत. त्यातून खरेदी केलेल्या मालमत्ताधारकांची फसवणूक होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत.
शहर विकास आराखडा एप्रिल २०२५ मध्ये मंजूर झाला. त्यामध्ये काही रस्ते मोठे करण्यात आले. काही मोठे रस्ते लहान केले. या शिवाय खासगी जागांवर दवाखाने, पार्किंग, शाळा, अग्निशमन केंद्र आदी सोयी सुविधांसाठी आरक्षणे टाकण्यात आली. ज्या ठिकाणी आरक्षणे पडली आहेत, ते फक्त जमीन मालकालाच माहीत. तेथे बांधकाम परवानगी भेटत नाही. जुनी घरे, दुकाने असतील, तर ती भविष्यात पाडली जातील. त्यामुळे काही चतुर मालमत्ताधारकांनी स्वस्त दरात मालमत्ता विक्रीला काढल्या आहेत. त्याचप्रमाणे मुख्य रस्त्यांवरील घरे, रो-हाऊस, फ्लॅट, दुकाने विक्रीला काढली आहेत. सोशल मीडियावर मालमत्ता विक्रीच्या पोस्ट टाकण्यात येतात. विशेष बाब म्हणजे बाजार मूल्यानुसार अत्यंत कमी दराने मालमत्ता विक्रीला आहेत. त्यामुळे दर पाहून अनेकजण खरेदीसाठी सरसावत असल्याचे चित्र पाहायला मिळते. खरेदीनंतर आपली फसवणूक झाल्याचे अनेकांच्या लक्षात आले.
फसवणूक झाल्यावर चौकशी
मालमत्ता खरेदी केल्यावर ती रस्त्यात किती बाधित होत आहे, याची चौकशी करण्यासाठी अनेक मालमत्ताधारक महापालिकेच्या नगररचना विभागात येतात. ८ ते १० फुट मालमत्ता बाधित होणार हे कळाल्यावर त्यांच्या पायाखालची वाळू सरकते. व्यवहार करण्यापूर्वी नागरिक महापालिकेच्या नगररचना विभागात येऊन कधीच चौकशी करीत नाहीत.
खरेदीपूर्वी अशी करा खात्री
महापालिकेच्या वेबसाईटवर नवीन विकास आराखड्याचे सर्व नकाशे उपलब्ध आहेत. नागरिकांनी तेथे जाऊन खात्री करावी. कळत नसेल तर मनपाच्या नगररचना विभागात जाऊन चौकशी करावी. या शिवाय ९४८५२०२०२० या व्हाॅट्सॲप क्रमांकावर हाय पाठवून कोणती सेवा हवी ते सांगावे. त्यात डीपी लिहून आल्यावर त्या वेबसाइटवर जाऊन झोन टाकावा. तेथे आरक्षण, रस्ता रुंदीकरण सर्व पाहता येईल, असे नगररचना उपसंचालक मनोज गर्जे यांनी सांगितले.