खबरदार! माझा फोटो वापराल तर.... कोर्टात खेचेन; शरद पवार यांचा इशारा
By स. सो. खंडाळकर | Updated: August 16, 2023 20:12 IST2023-08-16T20:11:51+5:302023-08-16T20:12:08+5:30
‘ पंतप्रधानांना मणिपूरपेक्षा पुन्हा सत्तेत येण्याचीच चिंता अधिक दिसते’ असा टोला शरद पवार यांनी लगावला.

खबरदार! माझा फोटो वापराल तर.... कोर्टात खेचेन; शरद पवार यांचा इशारा
छत्रपती संभाजीनगर : खबरदार! माझा फोटो वापराल तर.... कोर्टात खेचेन, असा स्पष्ट इशाराच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बुधवारी पत्रपरिषदेद्वारे दिला. पवार मंगळवारपासून छत्रपती संभाजीनगरात आहेत.
‘ पंतप्रधानांना मणिपूरपेक्षा पुन्हा सत्तेत येण्याचीच चिंता अधिक दिसते’ असा टोला पवार यांनी लगावला. देवेंद्र फडणवीस यांचा आदर्श घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा येईनची घोषणा केली आहे. देवेंद्र फडणवीस पुन्हा सत्तेत आले. पण उपमुख्यमंत्री होऊन. मोदींना काय व्हायचं आहे माहीत नाही? पण देशभर मोदींच्या विरोधात वातावरण आहे. आम्ही भाजपबरोबर जाण्याचा प्रश्नच नाही. जे आमच्यातून गेले त्यांच्याशीही आमचा संबंध नाही’, असेही पवार यांनी जाहीर केले.
या पत्रपरिषदेस माजी मंत्री जयसिंग गायकवाड, माजी मंत्री राजेश टोपे, आमदार रोहित पवार, माजी आमदार चंद्रकांत दानवे, नीलेश राऊत, महेश तपासे, संजय वाघचौरे, मुश्ताक अहमद, जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील, शहराध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन आदींची उपस्थिती होती.
मी इंडियातच आहे
आम्हाला वगळून कॉंग्रेस व शिवसेना (उबाठा) निवडणूक रणनीती आखत आहेत. या बातम्या जाणीवपूर्वक पसरवण्यात येत आहेत. उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली आहे. मी इंडियातच आहे. भाजपबरोबर जाणार नाही, याची ग्वाही शरद पवार यांनी दिली.