बीअर कंपन्यांकडे २३ कोटी थकले
By Admin | Updated: April 21, 2016 00:39 IST2016-04-21T00:03:55+5:302016-04-21T00:39:13+5:30
औरंगाबाद : जायकवाडीच्या पाण्याचा कच्चामाल म्हणून वापर करून भरमसाट उत्पादन घेणाऱ्या बीअर आणि मद्यनिर्मितीच्या दहा कंपन्यांकडे पाणीपट्टीचे २२ कोटी ८८ लाख रुपये थकले आहेत.

बीअर कंपन्यांकडे २३ कोटी थकले
औरंगाबाद : जायकवाडीच्या पाण्याचा कच्चामाल म्हणून वापर करून भरमसाट उत्पादन घेणाऱ्या बीअर आणि मद्यनिर्मितीच्या दहा कंपन्यांकडे पाणीपट्टीचे २२ कोटी ८८ लाख रुपये थकले आहेत. दरम्यान, मेअखेरपर्यंत आगामी पाटबंधारे खात्याकडे २००५ यावर्षी जायकवाडीच्या पाण्यावरील ‘रॉयल्टी’ वाढविण्याचा निर्णय घेतला होता. वाढीव रॉयल्टीनुसार महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळानेही (एमआयडीसी) पाण्याचे दर वाढविले होते. मद्य व बीअरनिर्मिती उद्योगांना प्रतिहजार लिटर पाण्यासाठी ४२.५० रुपये, तर इतर उद्योगांना प्रतिहजार लिटर पाण्यासाठी १६ रुपये दर आकारण्याचा निर्णय घेतला होता. बीअर व मद्यनिर्मिती कारखान्यांचा वाढीव दरास विरोध होता. त्यामुळे पाणीपट्टी न भरताच त्यांनी पाण्याचा वापर करून भरमसाट उत्पादन घेतले.
बीअर व मद्यनिर्मिती कारखाने पाणीपट्टी न भरताच पाण्याचा वापर करीत असल्याचे तब्बल सहा वर्षांनंतर म्हणजे २०११ यावर्षी निदर्शनास आले. ‘एमआयडीसी’ने पाणी तोडण्याचा इशारा दिल्यानंतर त्यांनी ४२.५० रुपये या दराने पाणीपट्टी भरण्यास सुरुवात केली; परंतु २००५ ते २०११ या कालावधीतील पाणीपट्टी थकीतच ठेवली. ‘एमआयडीसी’च्या अधिकाऱ्यांनी बुधवारी झालेल्या बैठकीत ही बाब विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली.
४० दिवसांसाठी आणखी कपात
जायकवाडीतील पाण्याचा प्रथम पिण्यासाठी त्यानंतर शेतीसाठी व शेवटी उद्योगांसाठी वापर करावा, असा प्राधान्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. शेतीसाठी पाण्याचा वापर गेल्या अनेक वर्षांपासून थांबविण्यात आला असताना, प्राधान्यक्रम डावलून उद्योगांना विशेषत: मद्यनिर्मिती उद्योगांना पाणीपुरवठा केला जात आहे. मराठवाड्यातील नागरिक पाण्यासाठी भटकंती करीत असताना बीअर व मद्यनिर्मिती करणाऱ्या उद्योगांसाठी जायकवाडीच्या पाण्याचा महापूर आणला गेल्याचे ‘लोकमत’ने वृत्तमालिकेद्वारे चव्हाट्यावर आणले होते. राज्यभरात त्याचे पडसाद उमटल्याने मद्यनिर्मिती उद्योगांची २० टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय १६ एप्रिल रोजी घेण्यात आला होता. मे अखेरपर्यंत या उद्योगांची आणखी पाणी कपात होण्याची शक्यता आहे.
हे आहेत थकबाकीदार
चिकलठाण्यातील महाराष्ट्र डिस्टिलरीकडे सर्वाधिक म्हणजे ६ कोटी ४९ लाख ९४, ३०२ रुपयांची थकबाकी आहे. मद्यसम्राट विजय मल्ल्या यांनी ही कंपनी खरेदी करून ‘युनायटेड स्पिरिट’ या नावाने उत्पादन घेणे सुरूकेले होते. काही महिन्यांपूर्वी ‘युनायटेड स्पिरिट’ची डायगो या अमेरिकन कंपनीला विक्री करण्यात आली होती, हे विशेष.
स्कोल ब्रेवरिजकडे ३ कोटी ३० लाख २०,३५९ रुपये, मिलेनियम बीअरकडे २ कोटी ६९ लाख, ३१,०१८, फोस्टर इंडियाकडे २ कोटी ६४ लाख ८३,१३९ रुपये.
रॅडिको डिस्टिलरीकडे २ कोटी ३७ लाख २५,८६६ रुपये, औरंगाबाद ब्रेवरिजकडे १ कोटी ९२ लाख, लीलासन्स इंडस्ट्रीजकडे १ कोटी ८७ लाख ३७,२२४ रुपये, इंडो-युरोपियन ब्रेवरिजकडे १ कोटी १२ लाख ९३,७०८, बीडीए लिमिटेडकडे ३४ लाख ८८,५४४ तर कार्ल्सबर्ग इंडियाकडे ९ लाख ५९,७३६ रुपयांची थकबाकी आहे.