छत्रपती संभाजीनगर : ‘बेटी बचाओ’ हे फक्त घोषवाक्य उरले आहे का? कारण आरोग्य विभागाच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडळाअंतर्गत असलेल्या ४ जिल्ह्यांत गेल्या ५ वर्षांत एक हजार मुलांमागे मुलींचे प्रमाण घटल्याचे समोर आले आहे. या ४ जिल्ह्यांत ५ वर्षांपूर्वीचा ९०० वरील मुलींचा जन्मदर आता ९०० च्या खाली आला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्भलिंग निदान आणि मुलींचे गर्भपात होत असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
आरोग्य विभागाच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडळात छत्रपती संभाजीनगरसह जालना, परभणी आणि हिंगोली या चार जिल्ह्यांचा समावेश आहे. परिमंडळात छत्रपती संभाजीनगरमध्ये पाच वर्षांपूर्वी मुलींचा सर्वाधिक जन्मदर म्हणजे एक हजार मुलांमागे ९५४ इतका होता. त्यात आता मोठी घसरण होऊन ८९५ वर आला आहे. इतर तीन जिल्ह्यांमध्येही अशीच घसरण झाली आहे. गतवर्षी सर्व जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांना सोनोग्राफी केंद्रांची तपासणी करण्याची सूचना करण्यात आली होती. परंतु त्यानंतरही गर्भलिंग निदानाचा ‘उद्योग’ सुरूच असल्याची स्थिती मुलींच्या जन्मदराच्या आकडेवारीवरून पहायला मिळत आहे. सामाजिक मानसिकता, मुलींबाबतचा दुजाभाव आणि व्यवस्थेची उदासीनता या साऱ्यांचा मिळून हा गंभीर परिणाम दिसतोय. आता तरी यंत्रणेला जाग येणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.
पाच वर्षातील लिंग गुणोत्तराचा आलेख (१००० मुलांमागे जन्मलेल्या मुलींचे प्रमाण)वर्ष - छत्रपती संभाजीनगर - जालना - परभणी - हिंगोली२०२०-२१ - ९५४ - ९२८ - ९४८ - ९०४२०२१-२२ - ९३३ - ८६१ - ९२७ - ९०७२०२२-२३ - ९४५ - ८९० - ८७८ - ९०६२०२३-२४ - ९१९ - ८५४ - ९६० - ९०१२०२४-२५ - ८९५ - ८७० - ८८९ - ८७०
ही घसरण का गंभीर आहे?-ही परिस्थिती गर्भलिंग निदान आणि अवैध गर्भपात, मुलींबाबत असलेली अनास्था यांचा परिणाम असू शकतो.- मुलींच्या तुलनेत मुलांचा जन्म अधिक होणे म्हणजे समाजात भविष्यात विवाह, संतुलन आणि सुरक्षिततेचे प्रश्न निर्माण होतात.- आरोग्य यंत्रणेकडून कडक तपासणी, कठोर कारवाईकडे दुर्लक्ष होत असल्याची स्थिती.- गर्भलिंग तपासणी रोखण्यासाठी तांत्रिक आणि प्रशासकीय यंत्रणा अधिक प्रभावी करणे आवश्यक.
कडक तपासणीचे आदेशपरिमंडळात नुकतीच बदली होऊन मी आलेली आहे. पूर्ण आढावा घेतला. मुलींचा जन्मदर कमी झाल्याचे लक्षात आले आहे. यासंदर्भात सोनोग्राफी सेंटर्सची कडकपणे तपासणी करण्याची आणि कोणी दोषी असेल तर कारवाईच्या सूचना केल्या आहेत. ‘पीसीपीएनडीटी’अंतर्गत जालना येथे कारवाईही करण्यात आलेली आहे.- डाॅ. कांचन वानेरे, आरोग्य उपसंचालक, छत्रपती संभाजीनगर
कठोर कारवाईची गरजमराठवाड्यात मुलींचा जन्मदर खूप घटला आहे. बीड जिल्हा तर रेड झोनमध्ये आहे. महिला असुरक्षित आहेत, मुलींमुळे कुटुंबांची प्रतिष्ठा जाते, ही मानसिकता बदलली तरच स्त्रीभ्रूण हत्या थांबेल. गर्भलिंग निदान, गर्भपातासाठी मोबाइल व्हॅनचा वापर होत आहे. ‘पीसीपीएनडीटी’ कायद्याची कडक अंमलबजावणी झाली पाहिजे. गर्भलिंग निदान करणाऱ्या, गैरपद्धतीने गर्भलिंग निदान करणाऱ्या मशीनची विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे.- मनीषा तोकले, ह्युमन राईट्स ॲक्टिव्हिस्ट