आग्या मोहळाचा अजिंठा लेणीत ५० पर्यटकांना डंख; उपाययोजनात पुरातत्व विभाग अपयशी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 19:56 IST2025-06-04T19:55:32+5:302025-06-04T19:56:01+5:30
या घटनांमुळे पर्यटक भयभीत झाले आहेत.

आग्या मोहळाचा अजिंठा लेणीत ५० पर्यटकांना डंख; उपाययोजनात पुरातत्व विभाग अपयशी
- श्यामकुमार पुरे
सिल्लोड : पुण्याहून अजिंठा लेणी बघण्यास आलेल्या ५० पर्यटकांवर मंगळवारी दुपारी ४ वाजता मधमाशांनी हल्ला केला. रविवारीही दुपारी ३ वाजता २७ पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना घडली होती. या घटनांमुळे पर्यटक भयभीत झाले आहेत.
अजिंठा लेणी क्रमांक २, ४ व २६ या लेणीच्या माथ्यावर प्रत्येकी १, तर लेणी क्रमांक १०च्या माथ्यावर ६ असे एकूण १० मधमाशांचे पोळे बसले आहेत. गेल्या ४ महिन्यांपासून अजिंठा लेणी पाहण्यास येणाऱ्या पर्यटकांवर या मधमाश्या हल्ला करीत आहेत. खराब असलेल्या जळगाव-छत्रपती संभाजीनगर रस्त्यामुळे अजिंठा लेणीला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत घट झाली असताना पुरातत्व विभाग याबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करीत नसल्याने अशा घटना वाढत आहेत.
या पार्श्वभूमीवर पुण्याहून आलेल्या ५० पर्यटकांवर मंगळवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास दिनेश सोपान गायकवाड (वय ४० वर्षे), दिव्या ताठे (वय २१ वर्षे), अर्चना दिनेश गायकवाड (वय ३५ वर्षे), हिंदवी दिनेश गायकवाड (वय ७ वर्षे), स्वराज दिनेश गायकवाड (वय १४ वर्षे) यांच्यासह ५० पर्यटकांवर मधमाशांची अचानक हल्ला केला. रविवारीही २७ पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केला होता. दोन्ही घटनेत जखमी झालेल्या पर्यटकांवर फर्दापूर, अजिंठा, सिल्लोड, पहूर, जळगाव, छत्रपती संभाजीनगर येथील विविध खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रविवारी झालेल्या हल्ल्यात जोधपूर येथील एक पर्यटक गंभीर जखमी झाला आहे. या व्यक्तीच्या शरीरातून चक्क ७० ते ८० विषारी काटे फर्दापूर येथील एका खासगी डॉक्टरने काढले आहेत. मधमाशांनी चावा घेतल्यानंतर पर्यटकांनी जीव वाचविण्यासाठी इकडे तिकडे पळापळ केली. त्यात खाली पडून एका पर्यटकाचा हात मोडला.
चार महिन्यांत एकूण ८०० पर्यटकांना चावा
दि. ५ एप्रिल रोजीही दुपारी कर्नाटकातील २५ ते ३० शाळकरी मुलांवर मधमाशांनी हल्ला केला होता. २२ एप्रिल रोजी लेणी क्रमांक २६ जवळ थायलंडमधील आठ पर्यटकांवर मधमाश्यांनी हल्ला केला होता. थायलंडमधील एक महिला या हल्ल्यामुळे बेशुद्ध पडली होती. तिला उपचारासाठी अजिंठा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. गेल्या चार महिन्यांत एकूण ८०० पर्यटकांना मधमाशांनी चावा घेतला आहे.
उपाययोजना करण्यात पुरातत्व विभाग अपयशी
पुरातत्व विभागाच्या वतीने गतवर्षी दर सोमवारी सुटीच्या दिवशी मधमाशा हुलवणारे बोलाऊन किंवा तैनात कर्मचाऱ्यांमार्फत धूर दाखवून त्यांना पळवून लावले जात होते; मात्र या धुरामुळे लेणीच्या चित्राकृतींना धोका निर्माण होतो, अशी तक्रार काही लोकांनी केल्याने पुरातत्व विभाग आता काहीच हालचाल करत नाही. त्यांच्या डोळ्या देखत पर्यटक मधमाशांच्या चाव्याने विव्हळत असताना पुरातत्व विभागाचे अधिकारी काहीही उपाययोजना करीत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.