बीडमध्ये दोन हवालदार सेवेतून बडतर्फ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 00:34 IST2018-09-07T00:32:05+5:302018-09-07T00:34:02+5:30
अल्पवयीन चोरट्याकडून सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम हिसकावून घेत त्याच्यावर कसलीही कारवाई न केल्याचा ठपका ठेवत स्थानिक गुन्हे शाखेच्या तत्कालीन दोन पोलीस हवालदारांना तडकाफडकी बडतर्फ करण्यात आले आहे

बीडमध्ये दोन हवालदार सेवेतून बडतर्फ
बीड : अल्पवयीन चोरट्याकडून सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम हिसकावून घेत त्याच्यावर कसलीही कारवाई न केल्याचा ठपका ठेवत स्थानिक गुन्हे शाखेच्या तत्कालीन दोन पोलीस हवालदारांना तडकाफडकी बडतर्फ करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी केली. या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
शेख जुबेरोद्दीन शेख रफियोद्दीन व सूर्यकांत किसनराव टाकळे अशी बडतर्फ केलेल्या हवालदारांची नावे आहेत. टाकळे व शेख हे दोघे स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत होते. २५ जून २०१८ रोजी परळी शहर ठाण्याच्या गुन्ह्यात एका अल्पवयीन चोरट्याला ताब्यात घेण्यात आले होते. हा चोरटा अट्टल गुन्हेगार होता. त्याच्याकडून रोख रकमेसह सोन्या चांदीच्या दागिन्यांची प्लास्टिक पिशवी जुबेर व टाकळे यांनी जप्त केली. परंतु त्याच्यावर पुढील कारवाई केली नाही. हाच ठपका ठेवत दोघांनाही पोलीस मुख्यालयाला पाठविले होते. त्यानंतर विभागीय चौकशी झाली. यामध्ये दोघेही दोषी आढळून आले. त्यामुळे त्यांच्या बडतर्फीचे आदेश पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी काढले आहेत.
जुबेर यांच्यावर सेवानिवृत्त सहायक फौजदाराला पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. हा आरोप सिद्ध झाल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. दरम्यान, या तडकाफडकी कारवाईमुळे आरोपींना सहकार्य करणाऱ्या पोलिसांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.
पिंपळनेर ठाण्याचे पो. ना. वायबसे निलंबित
२७ जुलै २०१८ रोजी सामाजिक वनीकरण विभागाचे वनरक्षक लक्ष्मण मारुती गाडे यांना शिवसेना जिल्हाध्यक्ष कुंडलिक खांडे यांनी मारहाण केली होती. याप्रकरणात येथील पोलीस नाईक विष्णू नारायण वायबसे यांनी या गुन्ह्यासंदर्भातील सर्व माहिती खांडे यांना दिली.
गुन्ह्यासंदर्भात माहिती देऊन त्यांना फरार होण्यास मदत केल्याचा ठपका ठेवत वायबसे यांना पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी निलंबित केले आहे. त्यांची यापुढे विभागीय चौकशी सुरु राहणार आहे. दरम्यान, दोन हवालदार व एक पोलीस नाईक यांच्यावर कारवाई करुन कामचुकार व अप्रामाणिकांना अधीक्षकांनी धडा शिकवला आहे.