धनंजय मुंडेंनी राजीनामा दिल्याशिवाय बीडची दहशत संपणार नाही: अंबादास दानवे
By बापू सोळुंके | Updated: February 14, 2025 13:45 IST2025-02-14T13:45:02+5:302025-02-14T13:45:45+5:30
मंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांचा राजीनामा घेतला होता. नंतर ते त्यातून निर्देाष सुटला हा भाग वेगळा.

धनंजय मुंडेंनी राजीनामा दिल्याशिवाय बीडची दहशत संपणार नाही: अंबादास दानवे
छत्रपती संभाजीनगर: संतोष देशमुख यांच्याशी संबंधित बातम्या पाहतो म्हणून एका जणाला बीड जिल्ह्यात मारहाण करण्यात आली. या घटनेतील आरोपी पाेलिसांना सापडत नाही, धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडे हे एकमेकांच्या सावलीसारखे काम करतात. मंत्र्यांचा सहभाग असल्याशिवाय अशा घटना घडूच शकत नाही, जोपर्यंत धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत बीडमधील दहशत संपणार नाही, अशी सडेतोड भूमिका विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते आ. अंबादास दानवे यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत मांडली.
आ. दानवे म्हणाले की, मंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांचा राजीनामा घेतला होता. नंतर ते त्यातून निर्देाष सुटला हा भाग वेगळा. येथे मात्र आरोपी वाल्मिक कराड आणि मंत्री धनंजय मुंडे यांचे घनिष्ठ संबंध जगजाहिर आहे. शिवाय कृषी साहित्य खरेदी घोटाळाही समोर आला. अशा परिस्थितीत त्यांनी नैतिक जबाबदारीने राजीनामा देणे आवश्यक होते. आगामी अधिवेशनात मात्र आम्ही त्यांना सोडणार नसल्याचे आ.दानवे म्हणाले.
आता मिन्नतवारी नाही... ज्याला जायचे त्याने जावे
छत्रपती संभाजीनगरमध्ये मेळावा आणि घरोघरी जाऊन बैठका घेऊनही उद्धवसेनेचे माजी नगरसेवक शिंदेगटात का गेले असा प्रश्न विचारला असता आ. दानवे म्हणाले की, लोक मोहापोटी पक्ष सोडतात. नगरसेवक गेले असले तरी पक्षसंघटन आमच्यासोबत आहे. पक्षाचा एकही शाखाप्रमुख, विभागप्रमुख,बूथ कार्यकर्ता अथवा अन्य पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडला नाही. यापुढे पक्ष आता कोणाचीही मिन्नतवारी करणार नाही. ज्याला जायचे त्याने खुशाल जावे अशा शब्दात त्यांनी पक्षाची भूमिका मांडली.
आ.दानवेंची सामंजस्याची भूमिका
खासदार मंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडे जेवायला गेल्याने युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी पक्षाच्या खासदारावर टीका केल्यानंतर खासदारांना आता जेवण्यासाठीही ठाकरेंकडून परवानगी घ्यावी लागेल,अशी टीप्पणी सत्ताधाऱ्यांनी केली आहे. याकडे लक्ष वेधले असता, आ.दानवे म्हणाले की, वर्षानुवर्ष एकाच पक्षात काम केले असल्यामुळे अनेकांचे व्यक्तिगत संबंध असतात. यामुळे जेवायला जाण्यासाठी परवानगी घेण्याची गरज नाही. आम्हीही शिंदेगटाच्या लोकांना भेटल्यानंतर बोलतोच म्हणजे फोडाफोडीचा विषय असतोच असे नाही, अशी सामंजस्याची भूमिका आ. दानवे यांनी घेतली.