छत्रपती संभाजीनगर : शिक्षक होऊन विद्यार्थ्यांना घडवण्याची जबाबदारी घेण्याआधीच एका भावी गुरुजींनी नसता उपद्व्याप केला आहे. उर्दू अध्यापनपद्धती या विषयाच्या पेपरला स्वतःऐवजी दुसऱ्याच उमेदवाराला पाठवून उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी बुधवारी खालिद खुर्शीद राशीदान याच्यासह इरफान सुलेमान शेख (रा. पानवाडी, फुलंब्री) यांच्यावर वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पदमपुऱ्यातील शासकीय अध्यापक महाविद्यालयात ३० एप्रिल रोजी दुपारी २ वाजता बी.एड.च्या उर्दू अध्यापन पद्धती विषयाचा पेपर होता. यासाठी प्राध्यापक डॉ. भाग्यश्री सुभेदार या परीक्षा केंद्रप्रमुख म्हणून नियुक्त होत्या. पेपर सुरू झाल्यावर तासाभराने सुभेदार परीक्षार्थींचे हॉलतिकीट तपासत होत्या. त्यावेळी त्यांना मौलाना आझाद महाविद्यालयाच्या खालिद खुर्शीद राशीदान या उमेदवाराच्या प्रवेशपत्रावरील छायाचित्र व स्वाक्षरी आणि प्रत्यक्ष स्वाक्षरीवरून शंका आली. त्यांनी सहकाऱ्यांना ही बाब तपासण्यास सांगितली. तेव्हा काही वेळातच त्याने तो इरफान असून, खालिदच्या सांगण्यावरून परीक्षेस आल्याची कबुली दिली.
अहवाल प्राप्त झाल्यानंतर गुन्हाडमी उमेदवाराची बाब उघड झाल्यानंतर महाविद्यालयाने याचा विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालकांना सविस्तर अहवाल पाठवला. ९ मे रोजी संबंधित विभागाने अहवाल पाठवून यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर सुभेदार यांनी पोलिस निरीक्षक प्रविणा यादव यांच्याकडे तक्रार दाखल केली. इरफानला यात लवकरच अटक करण्यात येईल, असे यादव यांनी सांगितले. उपनिरीक्षक नामदेव सुपे अधिक तपास करत आहेत.