बीडमध्ये महामार्ग ठरतोय मृत्यूमार्ग़
By Admin | Updated: August 29, 2014 01:29 IST2014-08-28T23:01:42+5:302014-08-29T01:29:59+5:30
शिरीष शिंदे , बीड शहरातून जाणारा धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग अक्षरश: मृत्यूमार्ग ठरत आहे़ या महामार्गावर दररोज तीन ते चार अपघात होतात, असे आकडेवारीतून समोर आले आहे़

बीडमध्ये महामार्ग ठरतोय मृत्यूमार्ग़
शिरीष शिंदे , बीड
शहरातून जाणारा धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग अक्षरश: मृत्यूमार्ग ठरत आहे़ या महामार्गावर दररोज तीन ते चार अपघात होतात, असे आकडेवारीतून समोर आले आहे़ मागील सहा वर्षामध्ये महामार्गावर सुमारे ३७०६ इतके अपघात झाले आहेत़ बळींची संख्या १८३७ इतकी आहे़ त्यामुळे अपघात रोखण्यासाठी प्रभावी उपाय महत्वाचे आहेत़
जिल्ह्यातून दोन महामार्ग जातात़ धुळे-सोलापूर व कल्याण-विशाखापट्टणम् या महामार्गांचा समावेश आहे़ पैकी धुळे-सोलापूर हा राष्ट्रीय महामार्ग सर्वाधिक अपघात प्रवण ठरत आहे़ बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, बस स्थानक परिसर, अण्णा भाऊ साठे पुतळा हे भाग सकाळी गर्दीने फुलून गेलेले असतात. सिग्नल संपले तरी वाहनांची रांग काही संपत नाही, अशी स्थिती आहे़ मिनिटाला दहा जड वाहने या महामार्गावरून जातात़
बीड शहरातील साठे चौकामध्ये एकाच दिवशी दोन पोलिसांचा ट्रकखाली चिरडून मृत्यू झाल्याची घटना तीन वर्षापूर्वी घडली होती़ त्यानंतर आणखी पाच जणांचे तेथे बळी गेले़ छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळील चौकही अतिशय धोकादायक ठरतो आहे़ तेथे महाविद्यालयीन विद्यार्थिनीसह मुख्याध्यापकाला आपले प्राण गमवावे लागले आहेत़
उड्डाणपूल, बायपासला विलंब का?
बीड शहरातील उड्डाणपुलाचा प्रश्न अनेक दिवसापासून प्रलंबित आहे़ बायपासचे कामही धिम्या गतीने सुरू आहे़ ही दोन कामे झाली तर अनेक निष्पाप लोकांचे प्राण वाचतील़ त्याचबरोबर शहराचे वैभव वाढणार आहे़; परंतु हे दोन्ही प्रश्न सोडविण्यास दिरंगाई होत असल्याचा आरोप भाजयुमोचे शहराध्यक्ष शेख फारूक यांनी केला़ आणखी किती बळी जाणार आहेत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे़
भाजी मंडईतील रस्ते अरूंद आहेत़ लगतच शाळा आहे़ त्यामुळे विद्यार्थी, खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांची कायम गर्दी असते़ येथे जड वाहनांना दिवसा प्रवेशास बंदी आहे़ मात्र मालवाहतूक करणारे ट्रक सर्रास ये-जा करतात़ याकडे वाहतूक पोलिसांचे 'अर्थ'पूर्ण दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे़ जड वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी होते शिवाय अपघातालाही निमंत्रण मिळते़ हातगाडे, छोटे विक्रेते रस्त्यावरच ठाण मांडतात त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडते़ जड वाहनांवर कारवाया सुरू आहेत, असे वाहतूक शाखेचे सहायक निरीक्षक एम़ ए़ सय्यद यांनी सांगितले़