बीड, उस्मानाबादेतून हरकती

By Admin | Updated: January 15, 2015 00:10 IST2015-01-14T23:56:25+5:302015-01-15T00:10:51+5:30

लातूर : आयुक्तालयाची अधिसूचना जाहीर झाल्यानंतर लातुरातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी हरकती नोंदविण्यास प्रारंभ केला आहे.

Bead, Osmanabad | बीड, उस्मानाबादेतून हरकती

बीड, उस्मानाबादेतून हरकती


लातूर : आयुक्तालयाची अधिसूचना जाहीर झाल्यानंतर लातुरातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी हरकती नोंदविण्यास प्रारंभ केला आहे. जिल्हा वकील मंडळासह आयुक्तालय निर्माण संघर्ष समितीच्या वतीने बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांतूनही हरकती याव्यात म्हणून जनजागृती करण्यात येत आहे.
आयुक्तालय निर्माण संघर्ष समितीच्या वतीने लातूरसह उस्मानाबाद व बीड जिल्ह्यांत दौऱ्याचे नियोजन केले असून, लोकप्रतिनिधींसोबत चर्चा करून हरकती घेण्यात येणार आहेत. बीड जिल्ह्यातील सर्व आमदार व खासदारांची भेट घेऊन लातुरात आयुक्तालय होणे किती गरजेचे आहे, या संदर्भात त्यांचे मन वळविण्यात येणार आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातीलही आमदार व खासदारांची भेट घेऊन लातूरला आयुक्तालय करण्यासंदर्भात हरकती नोंदविण्यासाठी साकडे घातले जाणार आहे. आयुक्तालय निर्माण संघर्ष समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. मनोहरराव गोमारे, निमंत्रक अ‍ॅड. उदय गवारे, महापौर अख्तर मिस्त्री, कार्याध्यक्ष अ‍ॅड. व्यंकट बेद्रे, अ‍ॅड. बळवंत जाधव यांच्यासह वकील मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. आण्णाराव पाटील व अन्य पदाधिकाऱ्यांचा लातूर, उस्मानाबाद दौरा आयोजित करण्यात आला आहे. २५ जानेवारीच्या आत या दोन्ही जिल्ह्यांचा दौरा करून तेथील लोकप्रतिनिधी व सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची भेट घेतली जाणार आहे. त्यांना नांदेडपेक्षा लातूर आयुक्तालयासाठी कसे सोयीचे आहे हे पटवून दिले जाणार आहे. लातूर जिल्ह्यात २७ विभागीय कार्यालये आहेत. शिवाय, आयुक्तालयाची भव्य अशी वास्तूही बांधण्यात आली आहे. बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांच्या अंतराच्या अनुषंगाने लातूर आयुक्तालय सोयीचे असल्याची बाब तेथील लोकप्रतिनिधींच्या निदर्शनास आणण्याचे काम २५ तारखेपर्यंत केले जाणार आहे.
लातूर, उस्मानाबाद आणि बीड या तिन्ही जिल्ह्यांतील हरकती लातूर वकील मंडळामार्फत दाखल केल्या जाणार आहेत. त्यानंतर न्यायालयात याचिका दाखल केली जाणार असल्याची माहिती आयुक्तालय निर्माण संघर्ष समितीचे निमंत्रक अ‍ॅड. उदय गवारे यांनी दिली.

Web Title: Bead, Osmanabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.