बसमध्ये चढताना सावधान; ढकलाढकलीत अडीच तोळे सोन्याची बांगडी गायब
By राम शिनगारे | Updated: March 27, 2023 19:55 IST2023-03-27T19:55:31+5:302023-03-27T19:55:43+5:30
मध्यवर्ती बसस्थानकातील प्रकार : क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

बसमध्ये चढताना सावधान; ढकलाढकलीत अडीच तोळे सोन्याची बांगडी गायब
छत्रपती संभाजीनगर : मध्यवर्ती बसस्थानकातून कन्नडकडे जाणाऱ्या बसमध्ये चढताना महिलेची ९० हजार रुपये किमतीची अडीच तोळे सोन्याची बांगडी हडपली. हा प्रकार २६ मार्च रोजी दुपारी बाराच्या सुमारास घडली. या प्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
फिर्यादी इंदूबाई रंगनाथ म्हस्के (रा. गजानन नगर, हडको परिसर) या बसमध्ये चढताना त्यांच्या एका हातातील अडीच तोळे सोन्याची बांगडी चोरट्यांनी गर्दीमध्ये लोटालोटी, ढकलाढकली करत अलगदपणे काढून घेतली. बसमध्ये चढल्यानंतर जागा मिळाली व सीटवर बसल्यावर इंदूबाई यांना हातात सोन्याची बांगडी आढळली नाही.
बराच वेळ त्यांनी बसमध्ये शोधाशोध केली पण ती सापडली नाही. यानंतर त्यांनी बसस्थानक पोलिस चौकीत ही माहिती दिली. त्यानंतर क्रांती चौक पोलिस स्टेशनच्या पोलिसांनी बसस्थानक येथील सीसीटीव्ही चेक केले, मात्र २७ कॅमेऱ्यांपैकी अर्ध्यावर कॅमेरे बंद स्थितीत असल्याने निदर्शनास आले. या प्रकरणी इंदूबाई म्हस्के यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, अज्ञात चोराविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. अधिक तपास निरीक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनात हवालदार साळवे करीत आहेत.