फटाके फोडताना थोडी काळजी घ्या, नाहीतर ‘चटका’च ! भाजल्यास काय कराल?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 16:33 IST2025-10-20T16:33:13+5:302025-10-20T16:33:45+5:30
लहान मुलांकडे द्या विशेष लक्ष

फटाके फोडताना थोडी काळजी घ्या, नाहीतर ‘चटका’च ! भाजल्यास काय कराल?
छत्रपती संभाजीनगर : दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव, पण काही वेळा याच प्रकाशाेत्सवात थोड्या दुर्लक्षपणामुळे फटाक्यांनी भाजल्याने आनंदाचे क्षण वेदनादायी बनतात. मात्र, थोडीशी खबरदारी घेतली तर अशा घटना टळू शकतात. विशेषत: लहान मुलांकडे अधिक लक्ष द्यावे, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला.
दिवाळीत अनेकजण अनार किंवा रॉकेट यासारखे फटाके हातात धरून उडविण्याचे धाडस करतात. परंतु, असे करणे अपघाताला आमंत्रण देणारे ठरू शकते. अती ढगळ, अती सैल, नायलॉनचे कपडे फटाके फोडताना वापरणे टाळावे, लहान मुलांना फटाके हाताळण्यापासून दूर ठेवावे, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला.
गतवर्षी ६० पेक्षा अधिकजण भाजले
शहरात दिवाळीत गतवर्षी ६० पेक्षा अधिक व्यक्ती फटाक्यांमुळे भाजले होते. यात लहान मुलांची संख्या अधिक होती. दिवाळीत रोषणाई करणारे अनार अचानक फुटल्यामुळे काहीजण भाजले, तर हातात बाॅम्ब फोडण्याचे धाडसही अनेकांना महागात पडले होते.
भाजले तर काय कराल ?
- सर्वप्रथम भाजलेल्या जागेला बर्फाने शेकावे. बर्फ नसेल तर थंड पाणीही चालेल. - भाजलेल्या जागेवर पेट्रोलियम जेली लावू शकतात.
- भाजलेल्या जागेवर फोड आल्यास त्याला फोडू नये.
ही घ्या काळजी...
- हातात धरून फटाके फोडू नका.
- फटाके खिशात ठेवणे टाळावे.
- झाडे आणि पाने नसलेल्या स्वच्छ जागेत फटाके वाजवावे.
- अनपेक्षित स्फोटापासून संरक्षणासाठी खराब फटाके पुन्हा पेटवू नका.
- मुलांकडे लक्ष ठेवा व फटाके फोडताना थंड पाण्याची बादली जवळ ठेवावी.
- फटाके उघड्या मैदानात फोडावेत.
- मोठे फटाके लहान मुलांना देऊ नयेत.
- पादत्राणे घालूनच फटाके वाजवावेत.
- न फुटलेले फटाके पुन्हा लावू नका.
थंड पाण्याखाली भाजलेली जागा धरावी
फटाके फोडताना काॅटनचे कपडे परिधान करावे. भाजले गेल्यास तो भाग वाहत्या थंड पाण्याखाली धरावा. ॲलोवेरा, पेट्रोलिमजेली भाजलेल्या जागेत लावू शकतो. मोठ्या प्रमाणात भाजल्यास ओरल अँटीबायोटिक, ड्रेसिंगची गरज भासते. त्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
- डाॅ. कपिल पल्लोड, त्वचारोगतज्ज्ञ
टूथपेस्ट, तेल लावू नका
भाजलेल्या ठिकाणी टूथपेस्ट, तेल अथवा स्वतः इतर अप्रमाणित उपचार केल्यामुळे जखमेमध्ये जंतुसंसर्ग होण्याची भीती असते. त्यामुळे असे उपचार करणे शक्यतो टाळावे. घरगुती उपचार करण्यात वेळ न दवडता तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
- डॉ. आसावरी टाकळकर, त्वचारोगतज्ज्ञ