सावधान ! क्रेडिट कार्ड सुरू करण्याच्या नावाखाली ५० हजारांची ऑनलाईन फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 19:19 IST2021-04-21T19:17:58+5:302021-04-21T19:19:18+5:30
शहरातील एका वर्तमानपत्र कार्यालयात काम करणारी महिला घरी असताना त्यांना एका अनोळखी क्रमांकावरून कॉल आला.

सावधान ! क्रेडिट कार्ड सुरू करण्याच्या नावाखाली ५० हजारांची ऑनलाईन फसवणूक
औरंगाबाद : क्रेडिट कार्ड सुरू करीत असल्याची थाप मारून तोतया बँक कर्मचाऱ्याने एका महिलेकडून ओटीपी विचारून घेत तिच्या खात्यातून ऑनलाईन ४९ हजार ४९० रुपये काढून फसवणूक केली. याप्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात तोतया बँक कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
सूत्राने सांगितले की, शहरातील एका वर्तमानपत्र कार्यालयात काम करणारी महिला घरी असताना त्यांना एका अनोळखी क्रमांकावरून कॉल आला. आरबीएल बँकेचा कर्मचारी बोलत असल्याचे आणि क्रेडिट कार्ड सुरू करीत असल्याचे त्याने सांगितले. याकरिता त्याने कार्डवरील सीव्हीव्ही क्रमांक विचारले. यानंतर त्याने पाठविलेले दोन वेगवेगळे ओटीपी क्रमांक विचारले. तक्रारदार यांनी त्याच्यावर डोळेझाकपणे विश्वास ठेवून त्याला ओटीपी क्रमांक सांगितले. ओटीपी सांगताच तक्रारदार यांच्या बँक खात्यातून अनुक्रमे २९ हजार ९९० रुपये आणि १९ हजार ५०० रुपये असे एकूण ४९ हजार ४९० रुपये परस्पर ऑनलाईन काढून घेतले. बँक खात्यातून रक्कम कपात झाल्याचे मेसेज त्यांना प्राप्त झाले. सायबर भामट्याने ऑनलाईन फसवणूक केल्याचे लक्षात येताच त्यांनी जिन्सी ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदविली.