वेळीच व्हा सावध! चुकीच्या सवयींमुळे तरुण वयातच कॅन्सर दार ठोठावतोय

By संतोष हिरेमठ | Updated: February 4, 2026 20:03 IST2026-02-04T20:02:57+5:302026-02-04T20:03:20+5:30

जागतिक कर्करोग दिन विशेष: हा आजार आता वय, सवय आणि व्यसन यांची वाट पाहत नाही. त्यामुळे वेळीच सावध झालेले बरे. 

Be careful in time! Cancer is knocking at the door at a young age due to wrong habits | वेळीच व्हा सावध! चुकीच्या सवयींमुळे तरुण वयातच कॅन्सर दार ठोठावतोय

वेळीच व्हा सावध! चुकीच्या सवयींमुळे तरुण वयातच कॅन्सर दार ठोठावतोय

छत्रपती संभाजीनगर : कॉलेज, नोकरी, करिअर, पार्टी, फूड या सगळ्याला वेळ आहे; पण, आरोग्यासाठी मात्र ‘नंतर बघू’ अशी सध्या मानसिकता दिसते. यातूनच एक गोष्ट वेगाने वाढतेय. तो म्हणजे कॅन्सरचा धोका. रात्री उशिरापर्यंत जागरण, फास्ट फूडवर चालणारा दिवस, प्लास्टिक कपमधील चहा-कॉफी, प्लास्टिकच्या भांड्यात गरम जेवण, प्रदूषण हे आता ‘नॉर्मल’ झालेय. पण, यातून कॅन्सर शरीर पोखरतोय. हा आजार आता वय, सवय आणि व्यसन यांची वाट पाहत नाही. त्यामुळे वेळीच सावध झालेले बरे. 

दरवर्षी ४ फेब्रुवारी रोजी ‘जागतिक कर्करोग दिन’ पाळला जातो. यानिमित्त विविध माध्यमातून कॅन्सरविषयी जनजागृती केली जाते. शासकीय कर्करोग रुग्णालयातील (राज्य कर्करोग संस्था) स्त्री कर्करोग विभाग प्रमुख डॉ. अर्चना राठोड म्हणाल्या, प्रत्येक व्यक्तीने त्या-त्या वयोगटात काही चाळणी परीक्षण करून घेतले तर कर्करोगाचे पूर्व स्थितीतच निदान होऊ शकते. कर्करोग प्रतिबंधक विभागाचे डॉ. हृषीकेश खाडीलकर म्हणाले, धूम्रपान, तंबाखूपासून दूर राहिलो, नियमित व्यायाम, संतुलित आहार, वेळेवर आरोग्य तपासणी केली तर ३० ते ४० टक्के कर्करोग प्रतिबंध करता येऊ शकतात.

शासकीय कर्करोग रुग्णालयातील २०२५ मधील रुग्णसंख्या
ओपीडी- ४२,९३७
आयपीडी- ७,७८५
मोठ्या शस्त्रक्रिया- १,१३६
लहान शस्त्रक्रिया- १,९१३
डे-केअर- ११,७५३

धूम्रपान न करणारेही रुग्ण
सध्या फुप्फुसांच्या कर्करोगाचे निदान वाढत आहे. फुप्फुसांच्या कर्करोगातील १५ - २५ टक्के रुग्ण हे धूम्रपान न करणारे असतात. यामध्ये महिलांचा व तरुणांचा मोठा वाटा असून, हवेचे प्रदूषण व घरातील धूर, धूळ ही प्रमुख कारणे आहेत. घरातील हवा स्वच्छ ठेवावी. घरात, कार्यालयात हवेचे शुद्धीकरण यंत्र वापरावे.
- डाॅ. अनुप तोष्णीवाल, कॅन्सरतज्ज्ञ

९५ टक्के कॅन्सर चुकीच्या जीवनशैलीने
फक्त ५ ते १० टक्के कॅन्सर हे आनुवंशिक (पिढ्यानपिढ्या चालत आलेले) असतात. उर्वरित ९० ते ९५ टक्के कॅन्सर हे चुकीची जीवनशैली आणि पर्यावरणातील घटकांमुळे होतात. म्हणजेच, आरोग्य आपल्या हातात आहे.
- डाॅ. प्रफुल्ल जटाळे, न्युक्लीअर मेडिसिन व पेट सिटी स्कॅन तज्ज्ञ

आधुनिक सुविधा
रुग्णालयात बोन मॅरो ट्रान्सप्लांट युनिट, रक्तपेढी सुरू करण्यासाठी शासनाला लवकरच प्रस्ताव सादर होईल. वैद्यकीय शिक्षण सचिव, आयुक्त, राज्याच्या कॅन्सर केअर प्रोजेक्टचे सल्लागार डाॅ. कैलास शर्मा, अधिष्ठाता डाॅ. शिवाजी सुक्रे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्करोग उपचारासाठी आधुनिक सोयीसुविधा उपलब्ध होत आहेत. रुग्णालयाचा सर्वांगीण विकास होत आहे.
- डाॅ. अरविंद गायकवाड, विशेष कार्यअधिकारी, शासकीय कर्करोग रुग्णालय

कर्करोग टाळण्यासाठी काय केले पाहिजे?
- फास्टफूड, हवाबंद कंटेनर्सचे अन्न टाळा.

- पालेभाज्या, फळे, कडधान्ये, ज्वारी-बाजरीचा आहार वाढवा.
- अति तळलेले, अतितिखट पदार्थ टाळा.

- स्वयंपाकात हळदीचा वापर जास्त करावा.
- प्लास्टिकच्या भांड्यात अन्न गरम करू नये.

- साखर, मैदा, जास्त मिठाचे पदार्थ मर्यादित ठेवा.
- रोज किमान ३० मिनिटे चाला, योग किंवा व्यायाम करा.

- वजन नियंत्रणात ठेवा, व्यसनांपासून पूर्ण दूर राहा.
- कुटुंबात कर्करोगाचा इतिहास असल्यास लवकर तपासणी सुरू करा.

- गाठ, न भरणारी जखम, वजन घटणे, शौच-लघवीतील बदलांकडे दुर्लक्ष करू नका.

Web Title : कैंसर का खतरा: गलत आदतें युवाओं को खतरे में डाल रहीं हैं, स्वास्थ्य प्राथमिकता!

Web Summary : युवाओं की जीवनशैली कैंसर के खतरे को बढ़ा रही है। देर रात जागना, फास्ट फूड, प्लास्टिक का उपयोग और प्रदूषण योगदान करते हैं। स्क्रीनिंग के माध्यम से शीघ्र पता लगाना, व्यायाम, आहार और तंबाकू से परहेज जैसी स्वस्थ आदतें कैंसर को रोक सकती हैं। जागरूकता, जीवनशैली में बदलाव और नियमित जांच रोकथाम के लिए महत्वपूर्ण हैं।

Web Title : Cancer knocking early: Bad habits endangering youth, prioritize health now!

Web Summary : Youth's lifestyle choices are increasing cancer risk. Late nights, fast food, plastic use, and pollution contribute. Early detection via screening, healthy habits like exercise, diet, and avoiding tobacco can prevent cancer. Awareness, lifestyle changes, and regular checkups are crucial for prevention.