प्लॅटफॉर्मवर अंघोळ,कपडे धुणे पडले महागात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2017 19:45 IST2017-06-24T19:45:36+5:302017-06-24T19:45:36+5:30
रेल्वेस्टेशनवर अस्वच्छता केल्याप्रकरणी या सर्व प्रवाशांकडून रेल्वे प्रशासनाने प्रत्येकी ३०० या प्रमाणे ३६०० रुपयांचा दंड वसूल केला

प्लॅटफॉर्मवर अंघोळ,कपडे धुणे पडले महागात
>ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 24 - रेल्वेस्टेशनवरील प्लॅटफॉर्मवर अंघोळ करणे आणि कपडे धुणे १२ प्रवाशांना चांगलेच महागात पडले. रेल्वेस्टेशनवर अस्वच्छता केल्याप्रकरणी या सर्व प्रवाशांकडून रेल्वे प्रशासनाने प्रत्येकी ३०० या प्रमाणे ३६०० रुपयांचा दंड वसूल केला.
देवदर्शनासाठी रेल्वेच्या विशेष बोगीने शनिवारी दुपारी काही प्रवासी औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर दाखल झाले होते. ही बोगी प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर थांबविण्यात आली होती. प्रवाशांच्या सुविधेसाठी या प्लॅटफॉर्मवर पाण्याची टाकी आणि नळ आहे. प्रवासातून आल्यामुळे बोगीतील काहींनी थेट प्लॅटफॉर्मवरच अंघोळ केली. तर काही जणांनी प्लॅटफॉर्मवरच कपडे धुवण्यास सुरुवात केली. त्यामुळे प्लॅटफॉर्म सांडपाण्याने भरून गेला. प्रवाशांनी कपडे धुतल्यानंतर ते वाळविण्यासाठी बोगीवर टाकले होते. हा प्रकार स्टेशन व्यवस्थापक लक्ष्मीकांत जाखडे, आरोग्य निरीक्षक आशुतोष गुप्ता आणि अन्य अधिकारी-कर्मचाºयांच्या निदर्शनास आला. त्यांनी तात्काळ प्लॅटफॉर्मवर धाव घेतली. रेल्वेस्टेशनवर अशाप्रकारे अस्वच्छता केल्याप्रकरणी त्यांनी प्रवाशांना चांगलेच सुनावले. यावेळी काही प्रवाशांनी त्यांच्याशी वादही घातला. परंतु कोणत्याही दबावाला न जुमानता रेल्वेस्टेशनवर अंघोळ आणि कपडे धुवून अस्वच्छता केल्यामुळे १२ प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली,असे रेल्वे अधिकाºयांनी सांगितले.