‘आधार’ लालफितीत !

By Admin | Updated: December 24, 2014 01:01 IST2014-12-24T00:59:41+5:302014-12-24T01:01:18+5:30

उस्मानाबाद : विविध योजनांचा लाभासाठी व शासकीय, निमशासकीय कार्यालयातील कामाजावेळी आधार कार्डची मागणी केली जात आहे़ ज्यांच्याकडे आधारकार्ड नाही

'Base' in red! | ‘आधार’ लालफितीत !

‘आधार’ लालफितीत !


उस्मानाबाद : विविध योजनांचा लाभासाठी व शासकीय, निमशासकीय कार्यालयातील कामाजावेळी आधार कार्डची मागणी केली जात आहे़ ज्यांच्याकडे आधारकार्ड नाही, अशा नागरिकांची त्यामुळे मोठी गैरसोय होत आहे़ मात्र, शासनाकडून आवश्यक ती यंत्रणा जिल्हास्तरावर पुरविली जात नसल्याने व जिल्हा प्रशासनाच्या उदासिनतेमुळे ‘आधार’ लालफितीत अडकल्याचे चित्र आहे़ आजवर जवळपास १२ लाख, १८ हजार नागरिकांची नोंदणी केल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात असले तरी तरी प्रत्यक्षात मात्र, जिल्ह्यातील अनेकांना आधार कार्ड मिळालेलेच नाही़
केंद्र शासनाने सुरू केलेल्या आधार नोंदणीस २०११ सालापासून राज्यात प्रारंभ झाला़ प्रारंभी जिल्हावासियांनी गावा-गावात नोंदणी व्हावी, यासाठी यंत्रणा उभा करण्याची मागणी प्रशासनाकडे लावून धरली होती़ केंद्र, राज्य शासनाने खासगी एजन्सीला नोंदणी करण्याचे काम दिले होते़ विशेष म्हणजे हे काम देताना ठराविक दिवसांची मुदत देण्यात आली होती़ एजन्सींनी नोंदणीचे लाखोतील आकडे आधारच्या कार्यालयात पाठविली़ मात्र, कार्डवाटप कमी प्रमाणात झाल्याची ओरड आल्यानंतर शासनाकडून झालेल्या पाहणीदरम्यान नोंदणी आणि कार्डांच्या पुरवठ्यात तफावत दिसून आली़ तर अनेक एजन्सींनी नोंदणी केलेला डाटा आधार कार्यालयाकडे पाठविला नसल्याचे दिसून आले़ त्यावेळी संबंधित एजन्सींवर दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली होती़ त्यामुळे काहींनी काम बंद केले़ त्यानंतर शासनाने त्यांना जुने काम वेळेत पूर्ण करून देण्याबाबत सांगितल्यानंतर काही एजन्सींनी जुन्या डाटावर काम सुरू ठेवले़ त्यानंतर जिल्ह्यासाठी जवळपास ४० आधार नोंदणीच्या मशीन देण्यात आल्या होत्या़ प्रारंभी या यंत्रणा भाडेतत्त्वावर देवून काम करुन घेण्याबाबत सांगण्यात आले होते़
मात्र, याला प्रतिसाद मिळत नसल्याने नंतर महा-ई सेवा केंद्रात या कीट ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या़ यंत्रणा चालविण्यासाठी लागणाऱ्या आॅपरेटरच्या परिक्षा घेण्यात आल्या़ मात्र, आॅपरेटर त्यात पास होत नसल्याने पुन्हा प्रश्न उभा राहिला होता़ काही महा ई सेवा केंद्रचालक नंतर ही परिक्षा पास झाले असून, त्यांच्याकडूनच नोंदणी करून घेण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे़ प्रशासन नोंदणी सुरू असल्याचे सांगत असले तरी सर्वसामान्यांना आधार कार्डची नोंदणी गावात, शहरात कुठे सुरू आहे याचीच माहिती नाही़ अनेकांची नोंदणी झालेली असताना अद्यापही कार्ड मिळालेले नाही़ दरम्यान, शासनाकडून अपेक्षित यंत्रणा उपलब्ध होत नसल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असला तरी त्या यंत्रणा मागवून घेण्यासाठी आवश्यक असलेला पाठपुरावा करण्यात जिल्हा प्रशासन कमी पडत असल्याचे दिसून येते. (प्रतिनिधी)
जिल्हा प्रशासनाकडे आलेल्या आधार यंत्रणांची तालुकानिहाय विभागणी करून नागरिकांच्या सोयीसाठी ३१ ठिकाणी आधार नोंदणी केंद्र सुरू करण्यात आले आहेत़ यात उस्मानाबाद, तुळजापूर व कळंब तालुक्यात प्रत्येकी ५, उमरगा तालुक्यात एक, लोहारा तालुक्यात दोन, भूम तालुक्यात सहा, परंडा तालुक्यात एक तर वाशी तालुक्यात चार ठिकाणी नोंदणी केंद्रे सुरू आहेत़ तर यातील तुळजापूर, लोहारा, भूम व परंडा येथील प्रत्येकी एक असे चार केंद्र बंद पडले आहेत़
जिल्हा प्रशासनाकडे आधार नोंदणीचा अहवाल असून, यात जिल्ह्यातील १२ लाख १८ हजार ७२३ नागरिकांच्या नोंदणी केल्याचे म्हटले आहे़ यात उस्मानाबाद तालुक्यातील २ लाख ४८ हजार ९४६, तुळजापूर तालुक्यातील २ लाख ७१६८, उमरगा तालुक्यातील २ लाख ५४ हजार ६२५, लोहारा तालुक्यातील ८५ हजार ८०४, भूम तालुक्यातील ९२ हजार ७२८, परंडा तालुक्यातील ९६ हजार ११३, कळंब तालुक्यातील १ लाख ६१ हजार ४५० तर वाशी तालुक्यातील ७१ हजार ८८९ नागरिकांच्या आधार कार्डसाठी नोंदणी करण्यात आल्याचे म्हटले आहे़
जिल्ह्यात एजन्सीमार्फत होत असलेले आधार नोंदणीचे ७५ टक्के काम पूर्ण झाले आहे़ उर्वरित २५ टक्के काम पूर्ण करण्यासाठी संबंधित तहसीलदारांना गावनिहाय कार्यक्रमाचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत़ कार्यक्रमाची माहिती संबंधित गावाला दोन-तीन दिवस अगोदर देण्यात येणार आहे़ आजवर नोंदणी झालेला डाटा वरिष्ठस्तरावर पाठविण्यात आला आहे़ तेथून पोस्टाद्वारे आधारकार्ड पाठविण्यात येते़ ज्यांना कार्ड मिळालेले नाही त्यांनी आता वेबसाईटवरून घेता येते़ नोंदणीपासून वंचित असलेल्यांनी कार्यक्रमादरम्यान नोंदणी करावी, असे आवाहन प्ऱनिवासी उपजिल्हाधिकारी तांबे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले़

Web Title: 'Base' in red!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.