बँकांनी पीककर्ज वेळेवर द्यावे
By Admin | Updated: April 30, 2015 00:39 IST2015-04-30T00:17:33+5:302015-04-30T00:39:23+5:30
बीड : गत तीन वर्षापासून जिल्ह्यातलाच नव्हेतर राज्यातला शेतकरी दुष्काळामुळे संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रीयकृत बँका

बँकांनी पीककर्ज वेळेवर द्यावे
बीड : गत तीन वर्षापासून जिल्ह्यातलाच नव्हेतर राज्यातला शेतकरी दुष्काळामुळे संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना सापत्न वागणूक देत असल्याच्या तक्रारी आहेत. बँकानी पिक कर्जाच्या संदर्भात सकारात्मक भूमिका घ्यावी, अशा सूचना पालकमंत्री व ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी राष्ट्रीयकृत बँकाच्या अधिकाऱ्यांना बुधवारी दिल्या.
आगामी काळात खरीप पिकासंदर्भात आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. याप्रसंगी पालकमंत्री मुंडे यांची उपस्थिती होती. यावेळी आ. भीमराव धोंडे, आर. टी. देशमुख, अॅड. लक्ष्मण पवार, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित, जि. प. सीईओ नामदेव ननावरे, जिल्हा कृषी अधिक्षक रमेश भताने, कृषी उप संचालक बी. एम. गायकवाड उपस्थित होते. याप्रसंगी २०१५-१६ या वर्षातील खरीप हंगामपुर्व आढावा घेण्यात आला. संभाव्य अडचणीवर मात करण्यासाठी शासन व प्रशासनाने सज्ज रहाण्याच्या सूचनाही अधिकारी कर्मचारी यांना देण्यात आल्या. मागील तीन वर्षापासून जिल्ह्यात दुष्काळी स्थिती आहे. यंदा पाऊस पडण्यापूर्वीच शेतकऱ्यांना खत, बी-बियाणे वेळेवर देण्यात येतील असा विश्वासही देणे आवश्यक असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
आठ दिवसात अहवाल द्या...
यापूर्वीचा राष्ट्रीयकृत बँकांचा शेतकऱ्यांच्या बाबतीतला अनुभव वाईट आलेला आहे. काही बँका तर दिलेले उदिष्ठ बँका पूर्ण करत नाहीत. अशा शब्दात भाजपाच्या आमदारांनी व पालक मंत्र्यांनी बँक अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी मंत्री मुंडे यांनी आठ दिवसाच्या आत बँकांनी शेतकऱ्यांना वाटप केलेल्या कर्जाचा अहवाल सादर करावा, तसेच जिल्हाधिकारी यांनी बँक अधिकाऱ्यांची बैठक घ्यावी, अशा सूचना आढावा बैठकीत दिल्या.
विमा कंपनीचा अहवाल नाही
जिल्ह्यात तीन वर्षापासून दुष्काळी स्थिती आहे. गतवर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पिक विमा भरला होता. मात्र मदत मिळाली नव्हती. यंदा देखील पिक विम्यापोटी ३१ कोटी २० लक्ष रूपये कंपनीकडे जमा झालेले आहेत. असे असताना देखील संबंधीत विमा कंपनीने अद्याप पर्यंत पिक विम्याच्या वाटपा बाबतचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे पाठविलेला नाही. यावर पालकमंत्र्यांनी १५ मे पर्यंत प्रत्यक्ष पिक विमा वाटपाच्या सुचना दिल्या आहेत.
यंदा पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाही तर शेतकऱ्यांचा वीमा कंपन्यावरील विश्वास उडेल, अशी चर्चाही यावेळी आढावा बैठकीत झाली. यावर १५ मे पर्यंत पीक विम्याच्या वाटपासंबंधीचे काम पूर्ण केले जाईल असे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले. (प्रतिनिधी)
आष्टी तालुक्यातील बहुतांश गावांना वेळेवर वीज मिळत नसल्यामुळे शेतकऱ्या बरोबरच जनावरांचे देखील पिण्याच्या पाण्याचे हाल होत आहेत. याकडे महावितरण विभागाचे दुर्लक्ष होत असल्याच्या कारणांवरून आमदारांनी महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारले असता, दुरूस्तीच्या कामाचे टेंडर देण्याचे काम सुरू असल्याचे महावितरणचे अधिक्षक अभियंता सुंदर लटपटे यांनी सांगितले.