बँकेचे हप्ते थकले, किराणा उधारीवर; ७०० आरोग्य कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांपासून वेतन नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 18:39 IST2025-04-17T18:38:44+5:302025-04-17T18:39:02+5:30

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील सुमारे ७०० अधिकारी- कर्मचाऱ्यांचे मागील दोन महिन्यांपासून वेतन झालेले नाही.

Bank installments are due, groceries are on loan; 700 health workers have not been paid for two months | बँकेचे हप्ते थकले, किराणा उधारीवर; ७०० आरोग्य कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांपासून वेतन नाही

बँकेचे हप्ते थकले, किराणा उधारीवर; ७०० आरोग्य कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांपासून वेतन नाही

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानातील सुमारे ७०० अधिकारी- कर्मचाऱ्यांचे मागील दोन महिन्यांपासून वेतन झालेले नाही. परिणामी कुणाचे बँकेचे हप्ते थकले आहेत, तर कुणाला किराणा उधारीवर घ्यावा लागत असल्याची परिस्थिती आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गंत प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, जिल्हा रुग्णालय या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, आरोग्यसेवकांसह विविध संवर्गाचे सुमारे ७०० अधिकारी-कर्मचारी कार्यरत आहेत.

फेब्रुवारीपासून वेतन न झाल्यामुळे ज्यांचे बँकेचे हप्ते आहेत ते थकले आहेत. किरायाच्या घरामध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना भाडे देणेही अवघड झालेले आहे. तसेच दैनंदिन गरजा पुरविण्यासाठी अनेक अडचणी निर्माण होत आहेत. येत्या दोन ते तीन दिवसांत वेतन न झाल्यास हे कर्मचारी संपावर जाऊन रुग्णसेवा विस्कळीत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

१८ वर्षांत पहिल्यांदा अशी स्थिती
जिल्ह्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानातील सुमारे ७०० अधिकारी- कर्मचाऱ्यांचे मागील दोन महिन्यांपासून वेतन झालेले नाही. माझ्या गेल्या १८ वर्षांतील सेवेत पहिल्यांदा अशी स्थिती झाली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
- संदीप पवार, अध्यक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी-कर्मचारी संघटना

पाठपुरावा सुरू
राष्ट्रीय आरोग्य अभियानातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी राज्यस्तरावर पाठपुरावा सुरू आहे. जिल्ह्यात जवळपास असे ७०० कर्मचारी आहेत.
- डाॅ. अभय धानोरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी

Web Title: Bank installments are due, groceries are on loan; 700 health workers have not been paid for two months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.