विद्यापीठात बहरणार केळीची बाग
By Admin | Updated: December 8, 2014 00:23 IST2014-12-08T00:19:43+5:302014-12-08T00:23:35+5:30
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरातील ५ एकर ओसाड जमिनीवर केळीची लागवड करण्याचा मनोदय कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी व्यक्त केला आहे.

विद्यापीठात बहरणार केळीची बाग
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरातील ५ एकर ओसाड जमिनीवर केळीची लागवड करण्याचा मनोदय कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी व्यक्त केला आहे. मार्चमध्ये टिश्यू कल्चर पद्धतीच्या रोपांची लागवड केली जाणार असून ती रोपे जळगाव येथील जैन इरिगेशन या संस्थेकडून आणली जाणार आहेत.
विद्यापीठातील क्रीडा महोत्सवाचा समारोप झाल्यानंतर १ डिसेंबर रोजी दुपारी कुलगुरू डॉ. चोपडे हे जळगावकडे रवाना झाले. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने आयोजित चारदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेत त्यांनी शोधनिबंध सादर केला. त्यानंतर त्यांनी आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या जैन इरिगेशन या संस्थेला भेट दिली. तेथे भंवरलाल जैन यांच्यासोबत, तसेच रिसर्च सेंटरमधील शास्त्रज्ञांसोबत संवाद साधला. त्यानंतर त्यांनी जळगाव जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन चर्चा केली.
केळीच्या टिश्यू कल्चरवर जैन इरिगेशनचे संशोधन झालेले आहे. एकरी पाच पटीने केळीच्या उत्पादनाची हमी देणाऱ्या या प्रकल्पास भेट दिल्यानंतर कुलगुरूंनी आपल्या विद्यापीठातही किमान ५ एकर परिसरात केळीची लागवड करण्याचा निश्चय केला. सुरुवातीला ५० लाख खर्च अपेक्षित असलेल्या या बागेच्या माध्यमातून वर्षभरानंतर दरवर्षी किमान १ कोटी रुपयांचे उत्पादन या बागेतून विद्यापीठाला मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
विद्यापीठातील ‘कमवा व शिका’ या योजनेतील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून या बागेचे काम केले जाईल. त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना केवळ नोकरीच्या मागे न लागता तंत्रशुद्ध व आधुनिक शेती कशी करावी, याचे ज्ञान मिळणार आहे, हाही यामागचा उद्देश आहे.