विद्यापीठ प्राधिकरण निवडणूक: ६ गणांच्या प्राथमिक यादीत ६ हजार ९७७ मतदार अर्ज वैध
By योगेश पायघन | Updated: September 26, 2022 19:59 IST2022-09-26T19:57:05+5:302022-09-26T19:59:27+5:30
आक्षेप नोंदवण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

विद्यापीठ प्राधिकरण निवडणूक: ६ गणांच्या प्राथमिक यादीत ६ हजार ९७७ मतदार अर्ज वैध
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्राधिकरणाच्या ६ निर्वाचक गणांच्या निवडणुकीसाठी रविवारी मध्यरात्री प्राथमिक मतदार याद्या जाहीर झाल्या. त्यात ६,९७७ अर्ज अवैध असून, त्यावर आक्षेप नोंदवण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. २८८ अर्ज अपात्र ठरल्याची माहिती कुलसचिव तथा निवडणूक निर्णायक अधिकारी डाॅ. जयश्री सूर्यवंशी यांनी दिली.
कुलसचिव डाॅ. जयश्री सूर्यवंशी यांच्याकडे आक्षेपांची सुनावणी होईल. कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनात सुरू असलेल्या विविध प्राधिकरणाच्या निवडणुकीसाठी मतदार नोंदणी प्रक्रियेनंतर झालेली छाननी पूर्ण झाली. पाच गटांतून ३९ अधिसभा सदस्यांची निवड होईल. त्यासाठी पदवीधर गटातून १०, संस्थाचालक ६, अध्यापक १०, विद्यापीठ अध्यापक ३, प्राचार्य १०, अशी ३९ अधिसभा सदस्यांची निवड होईल, तर विभाग प्रमुखांच्या गटातून ४ विद्याशाखेच्या ३८ अभ्यास मंडळांवर १०४ सदस्य निवडण्यात येतील. विद्या परिषदेचे आठ सदस्य असतात. प्राथमिक मतदार यादीत अपात्र झालेल्या २८८ जणांना आक्षेप नोंदवता येणार नाही, तर अवैध ठरलेल्या अर्जांना त्रुटीपूर्तता करून आक्षेप नोंदवता येण्याची संधी आहे, असे विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे यांनी सांगितले.
अशी आहे याद्यांची स्थिती
गण (सदस्य) -छाननी -वैध -अवैध -अपात्र
पदवीधर (१०)-४३,२६४ -३६७८७-६३११ -१६८
संस्था चालक (६)-२०० -१७६ -२३ -०१
प्राचार्य (१०) -१०१ -८०-१५ -६
अध्यापक (१०) -२,४२८ -२०५३ -३९० -४४
विद्यापीठ अध्यापक (३) -१४० -९८-३९ -३
अभ्यासमंडळ (३८) १,५३४ -१३२७ -१९९ -०८