पाकिटे घेऊन 'नो ग्रेड'चा खेळ; समितीतील सदस्यांची नावे जाहीर, विद्या परिषदेत गदारोळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 16:40 IST2025-12-30T16:35:23+5:302025-12-30T16:40:02+5:30
कॉलेजच्या मूल्यांकनासाठी पाकिटे घेण्याच्या मुद्द्यावरून विद्यापीठाच्या विद्या परिषदेत गदारोळ

पाकिटे घेऊन 'नो ग्रेड'चा खेळ; समितीतील सदस्यांची नावे जाहीर, विद्या परिषदेत गदारोळ
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयात अंकेक्षणासाठी गेलेल्या समितीने संस्थाचालकाकडून पाकिटे घेतल्याच्या आरोपावरून विद्या परिषदेत गदारोळ झाला. आरोप झालेल्या समितीच्या सदस्यांची नावे प्रकुलगुरूंनी सभागृहात वाचून दाखवली. त्याचवेळी चाैकशी समितीमध्ये आणखी दोन सदस्यांचा समावेश करण्याची घोषणा कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी केली.
विद्यापीठाच्या महात्मा फुले सभागृहात सोमवारी विद्या परिषदेची बैठक पार पडली. अध्यक्षस्थानी कुलगुरू होते. व्यासपीठावर प्र-कुलगुरू डॉ. वाल्मीक सरवदे, कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर यांची उपस्थिती होती. बैठकीच्या सुरुवातीलाच सदस्य डॉ. राजेश करपे यांनी महाविद्यालयाच्या मूल्यांकनासाठी गेलेल्या समितीने पाकिटे घेतल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी समितीच्या सदस्यांची नावे जाहीर करा, निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशीची आग्रही मागणी केली. त्याशिवाय कामकाज सुरू होऊ देणार नसल्याचे ते म्हणाले. त्यावर कुलगुरूंनी ‘लोकमत’ वृत्तपत्र मागवून घेत बातमीचे वाचन केले. त्यानंतर प्र-कुलगुरू डॉ. वाल्मीक सरवदे यांना खुलासा करण्याचे आदेश दिले. त्यानुसार डॉ. सरवदे यांनी चौकशीसाठी समिती नेमल्याची माहिती देत समितीमधील सदस्यांची नावे जाहीर केली. या विषयावर ज्येष्ठ सदस्य डॉ. दिलीप अर्जुने, डॉ. व्यंकटेश लांब, डॉ. प्रसाद मदन यांनी सखोल चौकशीची व समिती निवडताना पारदर्शकपणा पाळण्याची अपेक्षा व्यक्त केली.
समितीत कोण?
संस्थाचालकाने पाकिटे घेऊन ‘नो ग्रेड’ दिल्याचा आरोप झालेल्या समितीच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठातील प्रा. अभिजित शेळके, वाणिज्य विभागातील डॉ. विलास इप्पर, पैठणच्या प्रतिष्ठान महाविद्यालयातील मराठीचे विभागप्रमुख तथा मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. सर्जेराव जिगे आणि संगमनेर येथील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड यांचा समावेश असल्याची माहिती प्र-कुलगुरू डॉ. वाल्मीक सरवदे यांनी सभागृहाला दिली. दरम्यान, सदस्यांनी संस्थाचालकाचे आरोप फेटाळले.
सभागृहात ‘लाेकमत’ झळकला
संस्थाचालकाने केलेल्या तक्रारीविषयी ‘लोकमत’मध्ये २७ डिसेंबर रोजी वृत्त प्रकाशित झाले होते. त्या दिवशीचा अंकच सदस्य डॉ. राजेश करपे यांनी सभागृहात झळकावला. त्याशिवाय कुलगुरूंकडे सुपुर्द केला.
अधिसभा सदस्यांचेही निवेदन
संस्थाचालकाने केलेल्या आरोपांच्या सखोल चौकशीच्या मागणीसाठी अधिसभा सदस्य डॉ. नरेंद्र काळे, प्रा. हरिदास सोमवंशी, शेख जहूर, पूनम पाटील, माजी व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. फुलचंद सलामपुरे, सादिक शेख, दिग्विजय शिंदे आदींनी कुलगुरूंना मागण्यांचे निवेदन दिले.
...तर समितीच्या सदस्यांवर गुन्हे दाखल
चौकशी समितीवर आक्षेप घेतल्यानंतर कुलगुरूंनी त्यात आणखी दोन सदस्यांचा समावेश करण्याची घोषणा केली. त्यानुसार विद्यापीठातील डॉ. सुधाकर शेंडगे आणि प्राचार्य डॉ. भारत खंदारे यांचा समावेश करण्यात आला. त्यावर कुलगुरूंनी चौकशी पारदर्शकपणे होण्याची ग्वाही देत समितीने काही गडबड केल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल होतील, असेही स्पष्ट केले.