पदवीधरमध्ये मतपत्रिकांची झाली हेराफेरी; अपक्ष उमेदवार न्यायालयात धाव घेणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 19:07 IST2020-12-18T19:07:30+5:302020-12-18T19:07:45+5:30
हा सगळा प्रकार संशयास्पद असल्याचे लक्षात येताच निवडणूक अधिकारी सुनील केंद्रेकर यांच्याकडे तक्रारदेखील केली होती.

पदवीधरमध्ये मतपत्रिकांची झाली हेराफेरी; अपक्ष उमेदवार न्यायालयात धाव घेणार
औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतपत्रिका आणि मोजणी प्रक्रियेवरून पराभूत अपक्ष उमेदवार सिद्धेश्वर मुंडे यांनी आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे, तसेच न्यायालयात धाव घेण्याचा इशारा शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिला.
मुंडे यांनी दावा केला की, पाच हजारपेक्षा जास्त मतपत्रिका मतमोजणीदरम्यान कोऱ्या निघाल्या होत्या, तसेच मतपत्रिकेच्या पाठीमागे असणाऱ्या मतदान केंद्र प्रमुखांच्या सहीत सातत्याने बदल आढळून आले. हा सगळा प्रकार संशयास्पद असल्याचे लक्षात येताच निवडणूक अधिकारी सुनील केंद्रेकर यांच्याकडे तक्रारदेखील केली होती. केंद्रेकर यांनी तातडीने त्याबाबत उत्तर दिले;, परंतु त्यावर काही समाधान झाले नाही. त्यामुळे या विरोधात न्यायालयात जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मतमोजणीच्या दिवशी मुंडे यांच्यासह कुणाल खरात, सचिन ढवळे, रोहित बोरकर, विशाल नांदरकर यांनी याबाबत आवाज उठविला होता. मात्र, त्यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी केंद्रेकर यांनी दुसऱ्या फेरीची मोजणी सुरू असून, मतमोजणी थांबविणे शक्य नसल्याचे उमेदवारांना सांगितले होते, असे मुंडे यांनी सांगितले.
न्यायालयात धाव घेण्याची तयारी
याप्रकरणी मुंडे यांनी सांगितले की, प्रत्यक्ष मतदान केंद्रावर झालेले मतदान व मतमोजणीच्या वेळी झालेली मोजणी यामध्ये तफावत आढळून आलेली आहे. त्यामुळे याविरोधात न्यायालयात जाण्याची तयारी सुरू केली आहे. माझ्याकडे पुरावे असून, त्याआधारे याचिका दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.