बालहट्ट ! घर सोडून घोळक्यासोबत ११ वर्षांच्या मुलाचा रेल्वे प्रवास, आई-वडिलांचा जीव टांगणीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2021 13:23 IST2021-10-20T13:21:40+5:302021-10-20T13:23:10+5:30
नांदेडहून एक ११ वर्षांचा मुलगा एका घोळक्यासोबत नंदीग्राम एक्स्प्रेसने मुंबईला जात असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा दलाला मिळाली.

बालहट्ट ! घर सोडून घोळक्यासोबत ११ वर्षांच्या मुलाचा रेल्वे प्रवास, आई-वडिलांचा जीव टांगणीला
औरंगाबाद : घरातील कोणालाही काही न सांगता नांदेड येथून एका घोळक्यासोबत निघालेल्या ११ वर्षांच्या मुलाला रेल्वे सुरक्षा बल, लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे प्रवासी सेनेच्या मदतीने बुधवारी रात्री १० वाजेच्या सुमारास ( An 11-year-old boy's train journey with mob) औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर उतरवून घेण्यात आले. घोळक्यासोबत जाण्याचा हट्ट हा मुलगा करीत होता. मात्र, मोठ्या प्रयत्नाने समजूत काढून त्याला रेल्वेतून उतरविण्यात आले. मुलाविषयी माहिती मिळताच त्याचे आई-वडील राज्यराणी एक्स्प्रेसने औरंगाबादकडे निघाले.
नांदेडहून एक ११ वर्षांचा मुलगा एका घोळक्यासोबत नंदीग्राम एक्स्प्रेसने मुंबईला जात असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा दलाला मिळाली. हा मुलगा नांदेडचा रहिवासी होता. त्याचा शोध त्याचे कुटुंबीय घेत होते. हा मुलगा रेल्वेत असल्याचे कळताच रेल्वे सुरक्षा बल, लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे प्रवासी सेनेने मुलाला औरंगाबादेत उतरवून घेण्याचे नियोजन केले. ही रेल्वे औरंगाबादला येताच मुलाला उतरवून घेण्यात आले. यावेळी काहींनी विरोध केला. त्यामुळे काही वेळेसाठी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. अखेर मुलाला प्लॅटफाॅर्मवर उतरवून घेण्यात आल्याचे रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी यांनी सांगितले.
लोहमार्ग पोलीस ठाण्याचे धनराज गडलिंगे, यशवंत चौधरी, चरणसिंग राठोड, शिवबा गेजगे, वैभव सपकाळ, रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक परमवीरसिंग, एएसआय विजय वाघ, संतोषकुमार सोमाणी, रामा वाघमारे, मुजीब खान, बिंद्रा आदींनी यासाठी प्रयत्न केले.