वन विभागात नोकरी लावण्याचे आमिष, मंत्री दादा भुसे यांच्या नावे उकळले ५ लाख रुपये
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 16:25 IST2025-10-15T16:20:19+5:302025-10-15T16:25:01+5:30
पैसे मागण्यास गेलेल्या तरुणाला मारहाण, कुटुंबाला जीवे मारण्याच्या धमक्या, फसवणारे दोघे पसार

वन विभागात नोकरी लावण्याचे आमिष, मंत्री दादा भुसे यांच्या नावे उकळले ५ लाख रुपये
छत्रपती संभाजीनगर : सात लाख रुपयांत वन विभागात नोकरी लावून राज्याचे कॅबिनेट मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते ऑफरलेटर देतो, असे आमिष दाखवून तिघांच्या टोळीने सिल्लोड तालुक्यातील सौरभ बालाजी वाघ (२१) या तरुणाची ५ लाखांची फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पैसे मागायला गेलेल्या सौरभला त्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. रोहन विनोद जाधव असे मुख्य आरोपीचे नाव असून, त्याच्यासह त्याच्या दोन साथीदारांवर पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
शेतकरी कुटुंबातील सौरभ शिक्षणाच्या खर्चासाठी शहरात एका इव्हेंट कंपनीत नोकरी करतो. मार्च महिन्यात त्याची आरोपी रोहन सोबत ओळख झाली. त्याने त्याचे वडील विनोद जाधव सरकारी बँकेत व्यवस्थापक असून, मंत्र्यांसोबत उठबस असल्याचे सांगितले होते. शिवाय, मामाच्या ओळखीतून वनखात्यात नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी ७ लाख रुपयांचा खर्च असून, मंत्री भुसे यांच्या हातातून नियुक्ती पत्र देतो, असे आश्वासन दिले. सौरभचा त्याच्यावर विश्वास बसला. मे, २०२५ मध्ये त्याने त्याला शिवाजीनगरमध्ये शैक्षणिक कागदपत्रांसह ५० हजार रुपये दिले. त्यावेळी रोहनचा मित्र कार्तिक जाधवही सोबत होता. २१ मे रोजी रोहन सौरभच्या मुळ गावी सराटी येथे जात कुटुंबाला भेटला. तेव्हा, पुन्हा ५० हजार रुपये उकळले. २६ मे रोजी पुन्हा शहरात ७० हजार रुपये घेतले.
मुंबईला नेऊन पुन्हा पैसे उकळण्याचा प्रयत्न
विविध कारणे सांगून आरोपी रोहन हा सौरभकडून पैसे उकळत होता. यातील काही पैसे त्याची आई व मित्र गोकुळ प्रधान, ऋषिकेश पवार यांच्या खात्यावर पाठवले. ९ ऑगस्ट रोजी रोहनने सौरभला नियुक्तीपत्र देण्याचे कारण करून कारने मुंबईला नेत तुला दादा भुसे यांची भेट घालून देतो, असे सांगितले. मात्र, सौरभला चर्च गेट परिसरातच सोडून तो निघून गेला. सायंकाळी पुन्हा त्याला भेटून आणखी ४० हजार रुपयांची मागणी केली, तेव्हा सौरभला संशय आला. तो तसाच रेल्वेने शहरात परतला. त्यानंतरही सौरभने रोहनच्या सांगण्यावरून मित्र कार्तिक गिरी याला दहा हजार रुपये दिले.
मारहाण करण्यापर्यंत मजल मारली
सौरभ लहान असल्याचा गैरफायदा घेत आरोपींनी त्याला अनेक दिवस थापा मारल्या. सौरभ वारंवार त्यांना पैसे मागत होता. मात्र, त्यांनी नकार दिला. तोपर्यंत सौरभ त्याला एकूण ५ लाख रुपये देऊन बसला होता. यादरम्यान रोहनने त्याला मारहाण देखील केली. ३ सप्टेंबर रोजी तो वडिलांसोबत पुन्हा रोहनला भेटला. तेव्हा, पुन्हा त्याने त्याला मारहाण करत धमकावले. अखेर, सौरभने पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अशोक भंडारे यांच्याकडे तक्रार केली. गुन्हा दाखल झाल्याचे कळताच रोहन व त्याचे साथीदार पसार झाले. पोलिस उपनिरीक्षक अर्जुन राऊत अधिक तपास करत आहेत.