छत्रपती संभाजीनगर : पोलिस ठाण्यात तहसीलदार व अन्य महसूल अधिकाऱ्यांना वाईट वागणूक देत वाळू माफियांची बाजू घेणारे जिन्सीचे फौजदार प्रशांत पासलकर यांना निलंबित करण्याचे आदेश पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी सोमवारी जारी केले.
तहसीलदार रमेश मुंडलोड यांनी ६ फेब्रुवारीस रात्री विजय चौकातून वाळूचा हायवा जप्त केला. त्यांचे पथक हायवा तहसील कार्यालयात घेऊन जात असताना वाळू माफिया व निवृत्त पोलिस पवार याने शेकडो गुंडांसह मुंडलोड यांना धमकावत हायवा पळवून लावला. मुंडलोड तक्रार देण्यासाठी जिन्सी ठाण्यात गेले. ड्युटी ऑफिसर असलेल्या पासलकरने वाळू माफियांना पकडण्याऐवजी मुंडलोड यांच्याकडे दुर्लक्ष केले. ठाण्याच्या आवारात गुंड मुंडलोड यांच्या अंगावर धावून गेले. त्यांना सुरक्षित बाहेर काढण्याऐवजी दुर्लक्ष केले. त्यांची तक्रार न घेत रात्री १ वाजेपर्यंत ठाण्यात बसवून ठेवले.
परिणामी, मुंडलोड यांना स्वत:चे वाहन सोडून खासगी वाहनाने परतावे लागले. या घटनेमुळे पोलिस व महसूल विभागात चांगलाच वाद उफाळला. मुंबईपर्यंत याची चर्चा झाली. त्यानंतर सोमवारी पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी चौकशी करून पासलकरला तडकाफडकी निलंबित केले. यामुळे वाळू माफियांसोबत सलोख्याचे संबंध असलेले अन्य पोलिस अधिकारी, कर्मचारी देखील सतर्क झाले आहेत.