खराब रस्ता, गाईडचा अभाव तरी पर्यटकांचा अजिंठा लेणीकडे ओढा; रविवारी ५ हजारांवर भेटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 19:48 IST2025-08-04T19:47:39+5:302025-08-04T19:48:08+5:30
परिवहन विभागाला मिळाले १ लाखाचे उत्पन्न; वाहतुकीला अडथळे, गाईडची टंचाई ठोस उपायांची मागणी

खराब रस्ता, गाईडचा अभाव तरी पर्यटकांचा अजिंठा लेणीकडे ओढा; रविवारी ५ हजारांवर भेटी
सिल्लोड : मागील काही दिवसांपासून अजिंठा लेणी परिसराचे सौंदर्य हिरवाईने फुलले असून, पर्यटकांना आकर्षित करत आहे. रविवारी तब्बल ५ हजारांहून अधिक पर्यटकांनी लेणीला भेट दिली. या गर्दीमुळे परिवहन विभागाला तब्बल १ लाखाचे उत्पन्न मिळाले. मात्र, वाहनांच्या मोठ्या गर्दीमुळे फरदापूर टी पॉइंटवरील पार्किंग परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
सध्या अजिंठा लेणी परिसरात धबधबा फारसा वाहत नसला, तरी निसर्गरम्य वातावरण पाहण्यासाठी शनिवारी, रविवारी आणि मंगळवारी पर्यटकांची मोठी उपस्थिती असते. सोमवारी लेणी बंद असल्याने इतर दिवसांमध्ये पर्यटकांची संख्या सुमारे अडीच ते तीन हजारांपर्यंत असते. रविवारी सुमारे पाच हजारांवर पर्यटकांनी लेणी पाहण्यासाठी गर्दी केली होती. या पर्यटकांची ७ एसी आणि २ नॉन-एसी बसगाड्यांद्वारे फरदापूर टी पॉइंटहून लेणीपर्यंत ने-आण करण्यात आली, ज्यातून १ लाखांचे उत्पन्न मिळाले.
मधमाश्यांच्या हल्ल्यानंतर सुधारणा, वाढला पर्यटकांचा ओढा
मार्च, एप्रिल, मे महिन्यात लेणी क्रमांक १० व ४ च्या माथ्यावरील मध माशांच्या पोळाने ७०० पेक्षा अधिक पर्यटक जखमी केले होते. त्यामुळे पर्यटकांची संख्या कमालीची घटली होती. ‘लोकमत’ने याबाबत वृत्त मालिका प्रसिद्ध केले होते. याची दखल घेत पुरातत्व विभागाने जूनमध्ये येथील मधाचे सर्व पोळे हटवले, त्यानंतर पर्यटक पुन्हा लेणीकडे वळू लागले आहेत.
गाईड नाही, माहिती नाही !
सध्या लेणी परिसरात केवळ दोन गाईड कार्यरत आहेत. तेही अनेकदा उपलब्ध नसतात. यामुळे पर्यटकांना लेणी, चित्रे पाहूनच माघारी फिरावे लागते. पुरातत्व विभागाने तंबी दिल्यापासून चौकीदार माहिती देत नाहीत. गाईडअभावी लेणीचा ऐतिहासिक वारसा, कथा, गौतम बुद्ध यांच्याशी संबंधित अपेक्षित माहिती पर्यटकांना मिळत नाही. पर्यटकांचा ओघ बघता किमान १० ते १५ गाईड नेमावेत, अशी मागणी होत आहे.
घाटात वाहतुकीची कोंडी, पर्यटक वैतागले
सिल्लोड शहरातील आंबेडकर चौकात व भवन गावातील पूर्णा नदीवर सुरू असलेल्या कामामुळे, तसेच अजिंठा घाटात अरुंद रस्त्यांमुळे वाहतूक वारंवार ठप्प होते. रविवारीही अजिंठा घाट व आंबेडकर चौकात दुपारी ३ ते ४ वाजेदरम्यान एक तास वाहतूक ठप्प झाली होती, त्यामुळे पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली.