भारीच! विद्यापीठात पहिल्यांदाच चार वर्षांचा ऑनर्स पदवी अभ्यासक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 19:29 IST2025-06-03T19:29:48+5:302025-06-03T19:29:56+5:30

बी.एस्सी. इलेक्ट्रॉनिक्स, डाटा सायन्स, बीसीएचा समावेश, मानव्यशास्त्र विषयातही ’ऑनर्स’ कोर्स

Awesome! For the first time, a four-year honors degree course is being offered at the university | भारीच! विद्यापीठात पहिल्यांदाच चार वर्षांचा ऑनर्स पदवी अभ्यासक्रम

भारीच! विद्यापीठात पहिल्यांदाच चार वर्षांचा ऑनर्स पदवी अभ्यासक्रम

छत्रपती संभाजीनगर : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने चार वर्षांचा पदवी ‘ऑनर्स’ कोर्स यंदा सुरू होत आहेत, अशी माहिती प्रकुलगुरु डॉ.वाल्मिक सरवदे यांनी दिली. या विद्यार्थ्यांना दोन सेमिस्टर प्रत्यक्ष नामांकित कंपनीत काम करण्याची संधी मिळणार असून, त्यांना छात्रवृत्तीही देण्यात येणार आहे.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाप्रमाणे व्यवसायाभिमुख चार वर्षीय पदवी अभ्यासक्रम २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात येत आहेत. यामध्ये ’ॲप्रेंटिसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्राम’ (एईडीपी) हा चार वर्षाचा पदवी अभ्यासकम असणार आहे. कुलगुरु डॉ. विजय फुुलारी यांच्या अध्यक्षतेखाली ९ मे रोजी झालेल्या विद्या परिषद बैठकीत बी.एस्सी. (ऑनर्स) इंडस्ट्रीयल इलेक्ट्रॉनिक्स, बी.एस्सी (ऑनर्स) डाटा सायन्स, बीसीए (ऑनर्स) व बीए मानसशास्त्र (ऑनर्स) या अभ्यासक्रमांना मंजुरी दिली होती. बी.एस्सी. डेटा सायन्सला ३० तर उर्वरीत तीन अभ्यासक्रमांना प्रत्येकी ४० जागा असणार आहेत. या कोर्ससाठी बारावी विज्ञान, कला व वाणिज्य उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी इलेक्ट्राॅनिक्स, संगणकशास्त्र, व्यवस्थापनशास्त्र व मानसशास्त्र विभागाशी संपर्क साधावा, असे पदव्युत्तर विभागाचे उपकुलसचिव माधव वागतकर यांनी कळविले आहे.

नामांकित कंपन्यांसोबत सामंजस्य करार
या चारही अभ्यासक्रमांसाठी नामांकित कंपन्यासोबत सामंजस्य करार केले आहेत. तसेच या कंपन्यांचे प्रत्यक्ष कामकाज अनुभवही विद्यार्थ्यांना घेता येणार आहे. ‘इलेक्ट्रॉनिक्स’ कंपन्यांमध्ये देवगिरी इलेक्ट्रॉनिक्स, सिमेन्स, सीटीआर ॲन्युफॅक्चरिंग, एन्ड्रेस हौजर, व्हेरॉक, स्टारलाईट, व्हिडोओकॉन, धूत ट्रान्समिशन, क्रिश ऑटोमेशन, फ्लॅश इलेक्ट्रानिक्स, रोजन बर्गर, ॲडोनीस, रेल्कॉन हायोसंग एक्सीटॉनिक या कंपन्यांचा समावेश आहे.

नोकरी, रोजगार देणारे अभ्यासक्रम
पदवी, पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतरही रोजगाराच्या संधी न मिळालेल्या पदवीधरांची संख्या वाढते आहे. या पार्श्वभूमीवर ’मल्टीपल एन्ट्री व मल्टीपल एक्झिट’ या तत्त्वावर सुरू होणारे हे चारही अभ्यासक्रम शंभर टक्के रोजगार व स्वयंरोजगाराची हमी देणारे असणार आहेत.
- डॉ. वाल्मिक सरवदे, प्रकुलगुरू

Web Title: Awesome! For the first time, a four-year honors degree course is being offered at the university

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.