औरंगाबादमधील 'त्या' जलवाहिनीचे काम थर्ड पार्टी इन्स्पेक्शननंतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 15:28 IST2018-03-30T15:27:36+5:302018-03-30T15:28:09+5:30
पुंडलिकनगर जलकुंभ ते एन-५ पर्यंत ५०० मि.मी.ची जलवाहिनी टाकण्याचे काम महापौर नंदकुमार घोडेले यांनी थर्ड पार्टी इन्स्पेक्शन होईपर्यंत थांबविण्याचे आदेश गुरुवारी दिले.

औरंगाबादमधील 'त्या' जलवाहिनीचे काम थर्ड पार्टी इन्स्पेक्शननंतर
औरंगाबाद : पुंडलिकनगर जलकुंभ ते एन-५ पर्यंत ५०० मि.मी.ची जलवाहिनी टाकण्याचे काम महापौर नंदकुमार घोडेले यांनी थर्ड पार्टी इन्स्पेक्शन होईपर्यंत थांबविण्याचे आदेश गुरुवारी दिले. ती जलवाहिनी टाकण्याची गरज, किती नागरिकांना पाण्याची अडचण आहे. सर्व बाबींची माहिती पाहणीनंतर समोर येईल. त्यानंतर जलवाहिनीचे काम करायाचे की नाही, याचा निर्णय होणार आहे.
पुंडलिकनगर जलकुंभ पूर्ण क्षमतेने भरत नसताना त्या जलकुंभावर नवीन पाईपलाईन टाकण्यात येत असल्याने गेल्या महिन्यात ते काम बंद पाडण्यात आले होते. अभियंता चहल यांनी गुरुवारी पोलीस बंदोबस्तात ते काम सुरू करण्याचा प्रयत्न करताच नगरसेवक गजानन मनगटे, नगरसेविका मीना गायके, ज्योती मोरे यांनी घटनास्थळी धाव घेत घेराव घातला. एन-४ च्या भाजप नगरसेविका माधुरी अदवंत यादेखील तेथे आल्या. काम बंद करण्यावरून त्यांच्यात व सेना नगरसेवकांमध्ये वाद झाला. अभियंता गिरी यांना पाणीपुरवठा कुठून कसा करणार, ५०० मि.मी.ची जलवाहिनी दोन गल्ल्यांसाठी टाकतात का, याचा जाब सेना नगरसेवकांनी विचारला. महापौर घोडेले यांनी घटनास्थळी धाव घेतली. रामदास गायके, वत्सला राऊत, विशाल गायके, मंगल बडगुजर शिवसेना कार्यकर्त्यांनी जलवाहिनीस विरोध केला. गजानननगरचे नगरसेवक आत्माराम पवार यावेळी गैरहजर होते.
नगरसेवकांची भूमिका
जलवाहिनी टाकण्याच्या कामाचे अंदाजपत्रक तयार करू नये, तसेच नवीन कामही करू नये, असे आदेश मनपा आयुक्तांनी काढले आहेत. तरीही जलवाहिनी टाकण्याच्या कामाचा सपाटा सुरू आहे. पुंडलिकनगर जलकुंभ सद्य:स्थितीत पूर्ण क्षमतेने भरत नाही. १ लाख लोकांना पाणी देण्यासाठी तो जलकुंभ पूर्ण क्षमतेने भरण्याची जोपर्यंत व्यवस्था पालिका करीत नाही तोपर्यंत येथून नवीन जलवाहिनी टाकण्याच्या कामाला आमचा विरोध राहील, असे नगरसेवक मनगटे, गायके, मोरे यांनी सांगितले. नगरसेविका अदवंत म्हणाल्या की, एन-४ व परिसराला पाण्याचा तुटवडा आहे, जलवाहिनीचे काम करावेच लागेल.