ऐतिहासीक वारशात फुंकले प्राण, १२० वर्षांच्या शहागंज क्लॉक टॉवरची टिकटिक पुन्हा सुरू
By मुजीब देवणीकर | Updated: August 5, 2022 19:29 IST2022-08-05T19:27:10+5:302022-08-05T19:29:55+5:30
Aurangabad heritage: १९०१ ते १९०६ या काळात बांधण्यात आलेल्या ऐतिहासिक टॉवरवरील घड्याळ निजाम काळातील आहे.

ऐतिहासीक वारशात फुंकले प्राण, १२० वर्षांच्या शहागंज क्लॉक टॉवरची टिकटिक पुन्हा सुरू
औरंगाबाद : शहागंज येथील ऐतिहासीक क्लॉक टॉवरला स्मार्ट सिटी प्रशासनाने गतवैभव मिळवून दिले. क्लॉक टॉवरील घड्याळाची टिकटिक मागील काही दिवसांपासून सुरू नव्हती. अखेर हैदराबाद येथील तज्ज्ञांच्या मदतीने गुरूवारपासून टिकटिक सुरू झाली.
शहागंजचे क्लॉक टॉवर १९०६ मध्ये निझाम काळात उभारण्यात आले. यातील घड्याळ तासानुसार घंटा वाजवत असे. मागील काही वर्षांपासून टॉवरला उतरती कळा लागली होती. स्मार्ट सिटीतर्फे क्लॉक टॉवरचे नूतनीकरण केले. घड्याळासाठी मेकॅनिक उपलब्ध होत नव्हता. हैदराबाद येथील रमेश वॉच कॉर्पोरेशनने घड्याळ तयार करून इमारतीत बसवले. गुरुवारी घड्याळ सुरू करण्यात आले व घंटाही सुरू झाली. क्लॉक टॉवरच्या दुरुस्तीसाठी २९ लाख आणि घड्याळ बसवण्यासाठी साडे तीन लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.
टॉवरला ऐतिहासिक वारसा
शाहगंज, चमन येथील टॉवरला ऐतिहासिक वारसा आहे. १९०१ ते १९०६ या काळात बांधण्यात आलेल्या ऐतिहासिक टॉवरवरील घड्याळ निजाम काळातील आहे. पवित्र रमजान महिन्यात सहर आणि इफ्तारसाठी क्लॉक टाॅवरमधील अलार्म वाजवला जायचा. देखभाल दुरुस्तीअभावी अनेक वर्षांपासून घड्याळ बंद होते. दरम्यान, स्मार्ट सिटीच्या माध्यमातून ऐतिहासिक टॉवर, घड्याळाची दुरुस्ती करण्याचा निर्णय तत्कालीन मनपा प्रशासक तथा औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी घेतला होता.