औरंगाबादमध्ये अकरावीच्या १६ हजार जागा रिक्त; आता महाविद्यालयीन स्तरावर मिळणार  प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 18:42 IST2018-08-23T18:41:52+5:302018-08-23T18:42:46+5:30

महापालिका हद्दीतील ११२ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी राबविण्यात आलेल्या प्रवेश फेऱ्या संपल्या आहेत.

Aurangabad's 16 thousand vacancy in the eleventh class; Now admission at college level | औरंगाबादमध्ये अकरावीच्या १६ हजार जागा रिक्त; आता महाविद्यालयीन स्तरावर मिळणार  प्रवेश

औरंगाबादमध्ये अकरावीच्या १६ हजार जागा रिक्त; आता महाविद्यालयीन स्तरावर मिळणार  प्रवेश

औरंगाबाद : महापालिका हद्दीतील ११२ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी राबविण्यात आलेल्या प्रवेश प्रक्रियेच्या गुणवत्ता यादीप्रमाणे जाहीर होणाऱ्या फेऱ्या संपल्या आहेत. चार नियमित आणि एका विशेष फेरीनंतर १२ हजार ९४९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे, तर १६ हजार ४५६ जागा रिक्त असल्याची माहिती शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीतून समोर आली आहे.

राज्य सरकारने ११ वी प्रवेशासाठी मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर महानगरपालिका क्षेत्रात आॅनलाईन प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला होता. मागील वर्षी उडालेल्या गोंधळानंतर यावर्षी मे महिन्यापासूनच ११ वी प्रवेशासाठी आॅनलाईन नोंदणीची प्रक्रिया राबविण्यात आली. दहावीचा निकाल लागताच प्रक्रियेला वेग आला.

या प्रक्रियेसाठी एक निश्चित वेळापत्रक ठरविण्यात आले. या वेळापत्रकानुसार ३१ जुलैपर्यंत सर्व प्रवेश प्रक्रिया संपणार होती; मात्र सुरुवातीला मुंबई, नागपूर येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे वेळापत्रक बदलावे लागले. यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अल्पसंख्याक महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रियेसंदर्भात दिलेल्या आदेशामुळे दोन वेळा वेळापत्रक बदलण्याची नामुष्की शिक्षण विभागावर ओढावली. यामुळे अकरावी प्रवेश प्रक्रिया ३१ आॅगस्टपर्यंत लांबली आहे.

२१ आॅगस्टपर्यंत शिक्षण विभागाने चार गुणवत्ता याद्या आणि एक विशेष प्रवेश फेरी जाहीर केली. यातील पहिल्या चार फेऱ्यांमध्ये सर्वसाधारण आणि अल्पसंख्याक महाविद्यालयांमध्ये १२ हजार ३९१ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चिती केली आहे, तर शेवटच्या विशेष फेरीत १७७६ विद्यार्थ्यांचे अलॉटमेंट केले. त्यातील ५५८ विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतला आहे. यामुळे एकूण पाच फेऱ्यांमध्ये १२ हजार ९४९ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. ११२ महाविद्यालयांमध्ये २९ हजार ४०५ जागा उपलब्ध आहेत. झालेले प्रवेश आणि उपलब्ध जागांनुसार १६ हजार ४५६ रिक्त राहिल्या आहेत. या रिक्त जागांवर प्रथम येणाऱ्यास प्राधान्यानुसार महाविद्यालयीन स्तरावर प्रवेश देण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाने कळविले आहे.

२५ आॅगस्ट ते २ सप्टेंबरपर्यंत चालणार प्रक्रिया
अकरावी प्रवेशाच्या रिक्त राहिलेल्या जागांवर २५ आॅगस्ट ते २ सप्टेंबरपर्यंत नियमानुसार महाविद्यालयीन स्तरावर प्रवेश देण्यात येणार आहेत. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वाचा वापर केला जाणार आहे. या प्रवेशासाठीही तीन गट केले आहेत. यात पहिल्या गटात ८० ते १०० टक्के गुण प्राप्त विद्यार्थी. दुसऱ्या गटात ६० ते १०० टक्के विद्यार्थी आणि तिसऱ्या गटात दहावी उत्तीर्ण झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. या गटानुसार प्रवेश निश्चिती केली जाणार आहे.

तासिकांना महिनाभर विलंब
अकरावी प्रवेशाच्या प्रक्रियेला तब्बल महिनाभर विलंब झाला आहे. नियोजित वेळापत्रकानुसार ३१ जुलैपर्यंतच सर्व प्रवेश प्रकिया संपणार होती; मात्र विविध कारणांमुळे एक महिना विलंब झाला आहे. यामुळे महाविद्यालयातील तासिका महिनाभर विलंबाने सुरू होणार आहेत. काही महाविद्यालयांनी १ आॅगस्टपासूनच तासिकांना सुरुवात केली आहे; मात्र ज्या विद्यार्थ्यांनी उशिराने प्रवेश घेतला, त्यांचा अभ्यासक्रम कसा संपवणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

एक नजर
महाविद्यालये : ११२
उपलब्ध जागा : २९,४०५
झालेले प्रवेश : १२,९४९ 
रिक्त जागा : १६,४५६

Web Title: Aurangabad's 16 thousand vacancy in the eleventh class; Now admission at college level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.