औरंगाबाद हे चित्रपट उद्योगाचे केंद्र बनेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2020 12:55 PM2020-02-10T12:55:43+5:302020-02-10T13:02:00+5:30

औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप

Aurangabad will become the hub of the film industry: Govind Kendre | औरंगाबाद हे चित्रपट उद्योगाचे केंद्र बनेल

औरंगाबाद हे चित्रपट उद्योगाचे केंद्र बनेल

googlenewsNext
ठळक मुद्देसातव्या महोत्सवाला मिळालेला प्रतिसाद आनंददायी आहे.आठवा महोत्सव २० ते २४ जानेवारी २०२१ दरम्यान

औरंगाबाद : मुंबई, पुणे, दिल्ली याठिकाणीच चित्रपट, नाट्यांची निर्मिती होते, असे नाही. तर पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबादेतही निर्मिती होऊ शकते. मागील दोन दिवसांपासून याठिकाणी आयोजित महोत्सवाला युवा रसिकांचा मिळणारा उदंड प्रतिसाद पाहिल्यानंतर येत्या दहा वर्षांत औरंगाबादही चित्रपट निर्मितीच्या उद्योगाचे केंद्र बनेल, असा विश्वास राष्ट्रीय नाट्यसंस्थेचे माजी संचालक तथा ज्येष्ठ दिग्दर्शक  वामन केंद्रे यांनी व्यक्त केला.

औरंगाबादेतील प्रोझोन मॉलमध्ये ५ ते ९ फेब्रुवारीदरम्यान आयोजित सातव्या औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा रविवारी (दि.९) सायंकाळी थाटात समारोप झाला. यावेळी व्यासपीठावर पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे, संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, औरंगाबाद विभागीय केंद्राचे अध्यक्ष अंकुशराव कदम, विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र सिंघल, महापालिका आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, ज्येष्ठ दिग्दर्शक सुमित्रा भावे, वामन केंद्रे, महोत्सवाचे संचालक अशोक राणे, चंद्रकांत कुलकर्णी, प्रा. अजित दळवी, संयोजक नीलेश राऊत, सतीश कागलीवाल आदींची उपस्थिती होती.

प्रास्ताविकात अशोक राणे म्हणाले, सातव्या महोत्सवाला मिळालेला प्रतिसाद आनंददायी आहे. आठवा महोत्सव २० ते २४ जानेवारी २०२१ दरम्यान आयोजित केला जाणार आहे. दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी म्हणाले, महोत्सवाचा आनंद घेण्यासाठी १५० पेक्षा अधिक जण बाहेरून आले होते. प्रेक्षकांची संख्याही अडीच हजारांपेक्षा अधिक आहे. १०० हून अधिक नाट्यक्षेत्रातील दिग्गजांनी महोत्सवाला हजेरी लावली. ही आनंदाची बाब आहे. औरंगाबादचे वैभव ठरलेल्या वेरूळ महोत्सवाची सुरुवात करावी, एमटीडीसीच्या इमारतींची परिस्थिती सुधारावी, शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलशी जोडून पर्यटनाला चालना द्यावी, दौलताबादेत लाईट अँड साउंड शोचा धूळखात पडलेला प्रस्ताव मंजूर करावा, पर्यटन प्राधिकरणाची सुरुवात करून पर्यटनाला चालना देण्याची मागणीही त्यांनी राज्यमंत्र्यांकडे केली. यावेळी नंदकिशोर कागलीवाल, अंकुशराव कदम, मोक्षदा पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.या महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी दिग्दर्शक शिव कदम, जयप्रद देसाई, ज्ञानेश झोटिंग, आकाश कागलीवाल, डॉ. अपर्णा कक्कड, प्रा. दासू वैद्य, डॉ. आनंद निकाळजे, प्राचार्या रेखा शेळके, किशोर निकम, सुबोध जाधव, महेश देशमुख, अभिजित हिरप आदींनी प्रयत्न केले.

सिनेमा माणूस म्हणून सहिष्णू बनवतो
आजपासून ३५ वर्षांपूर्वी चित्रपट तयार करण्याच्या खेळाची मी खेळाडू झाले. तेव्हापासून असंख्य साथीदारांच्या सहकार्याने हा खेळ पुढे नेत आहे. चित्रपट हा माणूस म्हणून सहिष्णू बनवतो. औरंगाबादच्या चोखंदळ रसिकांनी माझ्या चित्रपटांचे कौतुक केले ही अभिमानाची बाब आहे. इतकेच नव्हे तर पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कारानेही माझा सन्मान केला, अशा शब्दांत ज्येष्ठ दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांनी मनोगत व्यक्त केले.

Web Title: Aurangabad will become the hub of the film industry: Govind Kendre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.