वर्षभरात होणार औरंगाबाद डिजिटली ‘स्मार्ट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 23:13 IST2018-10-28T23:12:50+5:302018-10-28T23:13:29+5:30
‘इंटरनेटचा पॅक संपलाय, पटकन रिचार्ज मारावा लागेल’ अशी औरंगाबादकरांची ओरड आता लवकरच संपणार आहे. कारण महानगरपालिका प्रशासनाने मनावर घेतले, तर येत्या वर्षभरात आपले शहर ‘डिजिटली’ स्मार्ट होणार असून, शहरात एकूण १४० ठिकाणी वाय- फाय सुविधा उपलब्ध होणार आहे.

वर्षभरात होणार औरंगाबाद डिजिटली ‘स्मार्ट’
औरंगाबाद : ‘इंटरनेटचा पॅक संपलाय, पटकन रिचार्ज मारावा लागेल’ अशी औरंगाबादकरांची ओरड आता लवकरच संपणार आहे. कारण महानगरपालिका प्रशासनाने मनावर घेतले, तर येत्या वर्षभरात आपले शहर ‘डिजिटली’ स्मार्ट होणार असून, शहरात एकूण १४० ठिकाणी वाय- फाय सुविधा उपलब्ध होणार आहे.
२९ आॅक्टोबर हा दिवस सर्वत्र जागतिक इंटरनेट दिन म्हणून ओळखला जातो. स्वयंपाकघरातल्या मिठापासून ते अंतराळापर्यंत कशा संदर्भातही अडचण आलीच, तर तात्काळ मदतीला येते ते इंटरनेट. याच इंटरनेटमुळे अख्खे जग एका छोट्याशा चेंडूसमान वाटत असून, अवघ्या एका ‘क्लिक’ वर येऊन ठेपले आहेत. प्रत्येक तंत्रज्ञानाचे काही फायदे आणि तोटे असतात त्याप्रमाणे इंटरनेटच्या तोट्यांकडे जर दुर्लक्ष केले, तर इंटरनेटद्वारे उपलब्ध होणाऱ्या सुविधांमुळे तरुणाई ‘इंटरनेट भक्त’ झाली आहे.
आता काळाच्या मागणीनुसार कोणतीही सिटी ‘डिजिटली स्मार्ट’ झाल्याशिवाय तिची गणना ‘स्मार्ट सिटी’मध्ये होऊ शकत नाही. त्यामुळे ‘स्मार्ट सिटी’ उपक्रमांतर्गत तयार करण्यात आलेल्या आराखड्यात ‘आयटी कनेक्टिव्हिटी आणि डिजिटलायझेशन’ अशी एक तरतूद आहे. या तरतुदीला अनुसरून औरंगाबाद शहर वर्षभरात डिजिटली स्मार्ट बनेल. या संदर्भातील टेंडर नुकतेच मान्य झाले असून कामास लवकरच सुरुवात होणार असल्याचे समजते.
चौकट :
डिजिटली स्मार्ट औरंगाबाद -
- या योजनेअंतर्गत महानगरपालिका, कॅनॉट गार्डन, निराला बाजार, औरंगपुरा, शहरातील विविध महाविद्यालये आणि आसपासचा परिसर, संपूर्ण जालना रोड, शहरातील प्रमुख चौक, मुख्य बाजारपेठा अशा एकूण १४० ठिकाणी वाय- फाय सुविधा उपलब्ध क रून दिली जाणार आहे.
- शहरातील ५० बस थांब्यांवर देखील ही सुविधा उपलब्ध असेल.
- शहर सुरक्षित करण्यासाठी एकूण ७०० कॅमेरे बसविण्यात येतील.
- या योजनेसाठी १.२ कोटींचा खर्च लागणार असून, सुरळीतपणे काम सुरू राहिले तर नऊ महिने ते एक वर्ष या काळात अशा प्रकारच्या सुविधा प्रत्यक्षात येतील, अशी माहिती मिळाली.