सावधान ! कोरोना प्रतिबंधक लस न घेताच फिराल तर ५०० रुपये दंड भराल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 13:11 IST2021-04-23T13:11:16+5:302021-04-23T13:11:43+5:30
fine for roaming without taking corona vaccine शहराची लोकसंख्या साधारणपणे १५ ते १६ लाख इतकी आहे. सध्या १० टक्के लसीकरण झाले आहे.

सावधान ! कोरोना प्रतिबंधक लस न घेताच फिराल तर ५०० रुपये दंड भराल
औरंगाबाद : लॉकडाऊन लागल्यानंतर आता कोणत्याही कामासाठी रस्त्यावर येणाऱ्या नागरिकांना लस घेतल्याचे प्रमाणपत्र दाखवावे लागेल, नसता ५०० रुपये दंड आकारण्याची कारवाई करण्याचा महापालिका प्रशासन गांभिर्याने विचार करीत असल्याचे मनपा प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी गुरुवारी सांगितले. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे आहे. त्या अनुषंगाने ११५ वॉर्डात लसीकरण सेंटर सुरू करण्यात आले असून ३० एप्रिलपर्यंत ४५ वर्षांवरील नागरिकांनी लस घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
प्रशासकांनी सांगितले, शहरातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी ग्रामीण भागातून आणि इतर जिल्ह्यातून उपचारासाठी आलेल्या रुग्णांसाठी त्यांचे नातेवाईक व्हेंटहलेटर, आयसीयू, ऑक्सिजन बेड मिळविण्यासाठी धावपळ करीत आहेत. शहराची लोकसंख्या साधारणपणे १५ ते १६ लाख इतकी आहे. सध्या १० टक्के लसीकरण झाले आहे. ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण केले जात असून त्यास प्रतिसाद मिळत आहे. जूनपर्यंत ५ लाख लसीकरण करण्याचे उद्दीष्ट मनपाने ठरविले आहे. १ मेपासून १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू होणार असल्यामुळे त्या दृष्टीने तयारी करण्यात आली आहे.
१ लाख ९० हजार नागरिकांना लस
शहरात मार्च महिन्यात एक हजार ते बाराशे रुग्ण आढळून येत होते. आता मात्र सहाशे ते सातशे रुग्ण दाखल होत आहेत. रुग्णसंख्या कमी होण्यामागे लसीकरण हे कारण आहे. आजवर १ लाख ९० हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.