किराणा चावडी, राजाबाजारचा कौल नेहमीच सेनेला तरी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 07:02 PM2020-01-23T19:02:13+5:302020-01-23T19:04:47+5:30

१९८८ मध्ये झालेल्या पहिल्या महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेने देदीप्यमान यश मिळविले.

Aurangabad Municipality Election : Kirana Chawdi, Raja Bazaar Kaul has always been in the Shiv sena ... | किराणा चावडी, राजाबाजारचा कौल नेहमीच सेनेला तरी...

किराणा चावडी, राजाबाजारचा कौल नेहमीच सेनेला तरी...

googlenewsNext
ठळक मुद्देनिवडणुकीत वॉर्डाचे चार तुकडे करण्यात आले आहेत.भाजपला शह देण्यासाठी सत्ताधाऱ्यांची खेळी

- मुजीब देवणीकर 

औरंगाबाद : शिवसेना वाढीसाठी जुन्या शहरात बळ देणारा वॉर्ड म्हणजे किराणा चावडी-धावणी मोहल्ला होय. या वॉर्डाने नेहमीच शिवसेनेला भरभरून दिले. आतापर्यंत झालेल्या सहा निवडणुकांमध्ये पाच वेळेस मतदारांनी सेनेला पसंती दिली. त्यातही येथील सिद्ध कुटुंबियांनी तीन वेळेस निवडणूक जिंकली. आता सिद्ध कुटुंबियांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. त्यामुळे एप्रिल २०२० मध्ये होणाऱ्या निवडणुकीत वॉर्डाचे चार तुकडे करण्यात आले आहेत. सेनेची ही खेळी सेना नेत्यांच्याच अंगलट येण्याची शक्यता आहे. 

१९८८ मध्ये झालेल्या पहिल्या महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेने देदीप्यमान यश मिळविले. या यशामध्ये किराणा चावडी, राजाबाजार, धावणी मोहल्ला या वसाहतींचे मोठे योगदान होते. शिवसेनेच्या गगनभरारीला पंख देण्याचे काम या भागातील शिवसैनिकांनी केले. गुलमंडी, धावणी मोहल्ला हा शिवसेनेचा गडच समजला जात होता. शहराच्या प्रत्येक कोपऱ्यात या भागाची दहशतही तेवढीच होती. मनपाच्या पहिल्या निवडणुकीपासून २०१० पर्यंत येथील मतदारांनी शिवसेनेच्याच उमेदवाराला निवडून दिले. १९८८ ते २००० पर्यंत या वॉर्डाला किराणा चावडी असे संबोधण्यात येत होते. नंतर या वॉर्डाला राजाबाजार असे नाव देण्यात आले. 

२०१५ मध्ये अपक्ष उमेदवार यशश्री बाखरिया निवडून आल्या. वॉर्ड ओबीसी महिलांसाठी राखीव होता. भाजपतर्फे रीना देवीलाल सिद्ध निवडणूक रिंगणात होत्या. बाखरिया यांना २,५८४ तर सिद्ध यांना १,९८२ मते पडली. एमआयएमचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष जावेद कुरैशी यांच्या पत्नी जरिना कुरैशी यांना ८१८ मते मिळाली होती. या वॉर्डाचे वैशिष्ट्ये म्हणजे सिद्ध कुटुंबियांना तीन वेळेस मतदारांनी पसंती दिली. तब्बल १५ वर्षे या कुटुंबियांकडे वॉर्डाची सत्ता होती. सेनेतील अंतर्गत मतभेदांमुळे माजी आ. किशनचंद तनवाणी यांनी काही वर्षांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश घेतला. त्यांच्यासोबत सिद्ध कुटुंबियांनीही सेनेला जय महाराष्टÑ केला. २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीत सिद्ध कुटुंबियांना पराभूत करण्यासाठी सेनेला चांगलीच कंबर कसावी लागली होती.

एप्रिल २०२० मध्ये होणाऱ्या निवडणुकीत पुन्हा एकदा सिद्ध कुटुंबीय भाजपकडून नशीब अजमावणार हे निश्चित. त्यापूर्वी मनपातील सत्ताधाऱ्यांनी वॉर्ड रचनेत राजाबाजारचे चार भागांत विभाजन केल्याचे बोलले जात आहे. फक्त सिद्ध कुटुंबियांसाठी सेनेने ही खेळी केल्याचा आरोप होत आहे. हा निर्णय सेनेलाच अंगलट येणार आहे. विभाजन केल्याचा फायदा सेनेलाही होणार नाही. वॉर्डाची रचना आणि आरक्षण लक्षात घेऊन संभाव्य उमेदवार आपले पत्ते ओपन करणार आहेत.

किराणा चावडी-राजाबाजारचे आजपर्यंतचे नगरसेवक
१९८८ - रमेश छापरवाल (शिवसेना)
१९९५ - पुष्पा गंगवाल (शिवसेना)
२००० - जगदीश सिद्ध (शिवसेना)
२००५ - वीणा गजेंद्र सिद्ध (शिवसेना)
२०१० - जगदीश सिद्ध (शिवसेना)
२०१५ - यशश्री बाखरिया
.................................
 

Web Title: Aurangabad Municipality Election : Kirana Chawdi, Raja Bazaar Kaul has always been in the Shiv sena ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.