Aurangabad Corona Virus News : लॉकडाऊन कधी लागणार ? मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे व्यापाऱ्यांचे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 14:06 IST2021-04-12T14:04:56+5:302021-04-12T14:06:11+5:30
संपूर्ण लॉकडाऊनमध्ये ऑनलाइन विक्री- खरेदी बंद करण्यात यावी, यासही ७२ संघटनेच्या अध्यक्ष व सचिवांनी ही मागणी उचलून धरली.

Aurangabad Corona Virus News : लॉकडाऊन कधी लागणार ? मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे व्यापाऱ्यांचे लक्ष
औरंगाबाद : लॉकडाऊन संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारी काय निर्णय घेतात याकडे शहरातील व्यापाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
कोरोनाचे वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय घेतला तरच व्यापारी त्यास पाठिंबा देतील, असा निर्णय शनिवारीच महाराष्ट्र चेंबरच्या राज्यव्यापी बैठकीत घेण्यात आला होता. मात्र, रविवारी मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन संदर्भात काहीच निर्णय घेतला नाही. सोमवारी निर्णय घेण्यात येईल, अशा बातम्या आल्याने सायंकाळी व्यापारी वर्गात नाराजीचा सूर व्यक्त केला जात होता. उद्या मुख्यमंत्री जो निर्णय घेतील त्यानंतर महासंघ दुकाने उघडण्यासंदर्भात पुढील निर्णय घेईल, अशी माहिती अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी दिली.
ऑनलाइन बैठक नंतर निवेदन
आज जिल्हा व्यापारी महासंघाची सकाळी ११ वाजता ऑनलाइन बैठक रविवारी सकाळी पार पडली. यात अध्यक्ष काळे यांनी महाराष्ट्र चेंबरच्या बैठकीत काय निर्णय झाला त्याची माहिती दिली. राज्य सरकार जर संपूर्ण लॉकडाऊन करणार असेल तरच व्यापाऱ्यांनी पाठिंबा द्यावा नसता दुकाने उघडावीत, असा निर्णय घेण्यात आला. संपूर्ण लॉकडाऊनमध्ये ऑनलाइन विक्री- खरेदी बंद करण्यात यावी, यासही ७२ संघटनेच्या अध्यक्ष व सचिवांनी ही मागणी उचलून धरली. यानंतर एक महासंघातर्फे निवेदन तयार करण्यात आले व जिल्हाधिकाऱ्यांना ऑनलाइन पाठविण्यात आले.