महापालिका घेणार महाविद्यालयांत कोरोना लसीकरण शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2021 16:00 IST2021-10-22T15:58:25+5:302021-10-22T16:00:27+5:30
Corona Vaccination Camp in Colleges: २३ ऑक्टोबर रोजी देवगिरी महाविद्यालय, २५ ऑक्टोबर रोजी एमपी लॉ महाविद्यालय येथे लसीकरण शिबिर

महापालिका घेणार महाविद्यालयांत कोरोना लसीकरण शिबिर
औरंगाबाद : महापालिका ( Aurangabad Municipal Corporation ) महाविद्यालयांत कोरोना प्रतिबंधक लसीकरण ( Corona Vaccination Camp in Colleges ) शिबिर आयोजित करणार आहे. आजवर किती विद्यार्थ्यांनी, कोणती लस घेतली आहे, याची माहितीही महाविद्यालयांनी संकलित करण्याबाबत विद्यापीठ आणि महाविद्यालयांना कळविल्याचे मनपा आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले.
शहरातील १८ वर्षांच्या पुढील तरुणांनी तातडीने कोरोना लस घ्यावी, याकरिता ही मोहीम राबविण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत २३ ऑक्टोबर रोजी देवगिरी महाविद्यालय, २५ ऑक्टोबर रोजी एमपी लॉ महाविद्यालय येथे लसीकरण शिबिर होणार आहे. तसेच सरस्वती भुवन, वाय.बी. चव्हाण कॅम्पस, विवेकानंद महाविद्यालय आणि सर सय्यद कॉलेज यांना पत्र देण्यात आले आहे. याशिवाय शहरातील मॉल, मेल्ट्रॉन, उच्च न्यायालय या ठिकाणीसुद्धा लसीकरण सुरू असणार आहे. शहरात सध्या ७० ठिकाणी नियमित लसीकरण केंद्रे सुरू आहेत, अशी माहिती डॉ. मंडलेचा यांनी दिली.
१० लाख ५५ हजार ६०० चे लक्ष्य
शहरात १० लाख ५५ हजार ६०० नागरिकांचे लसीकरण करण्याचे लक्ष्य आहे. त्यापैकी ९ लाख २१ हजार १७ जणांनी लस घेतली आहे. तीन लाख ३९ हजार नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत, तर पाच लाख ८१ हजार ३५७ जणांनी पहिला डोस घेतला आहे.