सातवाहनपूर्वीचा इतिहास धुंडाळण्याचा प्रयत्न
By Admin | Updated: January 30, 2015 00:49 IST2015-01-30T00:44:46+5:302015-01-30T00:49:23+5:30
विशाल सोनटक्के , उस्मानाबाद तेर येथे १९५८ मध्ये चाफेकर यांनी उत्खनन केले. त्यानंतर पुरातत्व विभागाचे तत्कालिन संचालक डॉ. दीक्षित यांनी १९६८ साली आणि १९७५ साली डॉ.

सातवाहनपूर्वीचा इतिहास धुंडाळण्याचा प्रयत्न
विशाल सोनटक्के , उस्मानाबाद
तेर येथे १९५८ मध्ये चाफेकर यांनी उत्खनन केले. त्यानंतर पुरातत्व विभागाचे तत्कालिन संचालक डॉ. दीक्षित यांनी १९६८ साली आणि १९७५ साली डॉ. शांताराम देव आणि डॉ. पथी यांनी उत्खनन केले. त्यानंतर ३९ वर्षानी पुन्हा उत्खननाची संधी मिळाली आहे. या माध्यमातून तेरच्या सातवाहन बरोबरच सातवाहनपूर्वीचा इतिहास धुंडाळण्याचा आम्ही प्रयत्न करीत असल्याचे पुरातत्व विभागाच्या उपसंचालिका डॉ. माया पाटील यांनी सांगितले.
तेर येथे उत्खननाचे काम हाती घेण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. पाटील यांच्याशी संवाद साधला असता त्या म्हणाल्या की, प्राचीन काळी मराठवाडा दक्षिणापथ देशामध्ये मोडत होता. मराठवाड्यात भोगवर्धन (भोकरदन) आणि प्रतिष्ठान (पैठण) ही सातवाहनांची राजधानी होती. त्याकाळी प्रतिष्ठाननंतर महाराष्ट्रात तगर (तेर) महत्वाचे शहर म्हणून ओळखले जात होते. तेरचा भडोचमार्गे रोम शहराशी मोठ्या प्रमाणात व्यापार होत असल्याचे अभ्यासाअंती सिद्ध झालेले आहे. १९५८ मध्ये पुरातत्व विभागाच्या वतीने पहिल्यांदाच तेरमध्ये उत्खनन करण्यात आले. या उत्खननात इस. पूर्व चौथे शतक ते इस. च्या चौथ्या शतकातील कालखंड प्रकट झाला. या उत्खन्ननात सर्वात खालच्या स्तराला उत्तरेकडील काळी शिलेदार खापरे सापडली होती, तर त्यानंतरच्या स्तरात मृढमयी मुर्ती आणि लाल रंगाची खापरे आढळून आल्याचे सांगत, डॉ. मोरेश्वर दीक्षित यांच्या उत्खननानुसार तेरच्या पहिल्या वस्तीचा कालखंड इस. पूर्व सुमारे ४०० ते २०० म्हणजे मौर्यपूर्व ते मौर्य असा ठरविता येतो. मौर्य काळात सर्व जनपदे ही सम्राट अशोकाच्या अधिपत्याखाली येत होती.
दरम्यान, उत्खनन ही प्रक्रिया जितकी चिकाटीची तितकीच मेहनतीची आहे. पुरातत्ववेत्यांनी अभ्यासाच्या सोयीसाठी पुराश्मयुग, मध्याश्मयुग आणि नवाश्मयुग असे आश्मयुगाचे तीन भाग पाडलेले आहेत. भारतामध्ये सिंध व केरळचा काही भाग सोडल्यास तेथे पूर्व पुराश्मयुगाचे अवशेष सापडतात. यानंतरचा काळ मध्यपुराश्मयुगाचा. मध्यपुराश्मयुगाची साक्ष देणारी त्याकाळची काही स्थळे महाराष्ट्रात नागपूरजवळ आढळून आलेली आहेत. यानंतर उत्तरपुराश्म काळ येतो. या काळात हवामान, प्राणी, वनस्पती यामध्ये बदल झाला. याच काळात हत्यारे बनविण्याचे तंत्र उत्कृष्ठ असल्याचेही अभ्यासातून पुढे आले. महाराष्ट्रात या काळातील संस्कृतीच्या खुणा जळगाव, चंद्रपूर या जिल्ह्यात सापडतात. यानंतर मध्याश्मयुग येते. या काळात गारगोटीपासून सुक्ष्म हत्यारे बनविली गेली तसेच याच काळात गवत, गोड धान्य उगवू लागले. या काळात भोपाळजवळ भिमबेटका येथे त्याकाळची चित्र (पेंटींग्ज) आढळून आली. नंतरचा काळ हा नवाश्मयुग. या युगात मानव शेती करून धान्य पिकवू लागला. तसेच याच युगापासून पशुपालनास सुरुवात झाली. आणि त्यानंतरच मानव खऱ्या अर्थाने स्थिर जीवन जगू लागला. यानंतरचा काळ ताम्रपाषाण युग आणि त्यानंतर महाश्मयुग आणि लोहयुग ही युगे अस्तित्वात आली. म्हणजेच मानवाचा इतिहास पाषाणयुगातून आजच्या अणुयुगापर्यंत येवून पोहोचला आहे. आपल्याला माहित असलेला इतिहास आपण समजून घेतो. त्याचा अर्थ लावतो. मात्र आपल्या अगोदर हजारो वर्षापूर्वीचे जीवन समजून घेण्याचे, त्याला उजेडात आणण्याचे काम पुरातत्व विभागाच्या वतीने करण्यात येते आणि उत्खन्नन हा त्यातील प्रमुख भाग असल्याचे डॉ. माया पाटील यांनी सांगितले. सिंधु संस्कृतीमध्ये ताट-वाटी सारख्या वस्तू सापडत नाहीत. तर बॉईल, जाळीसारखी भांडी आढळून येतात. तर आपल्याकडे रोमन पद्धतीत मातीची सुरई, लाल काळ्या रंगाची भांडी आढळून येतात.
केंद्र आणि राज्य पुरातत्व विभागातर्फे उत्खननाचे काम चालते. राज्यातील काही प्राचीन वास्तू राज्याच्या पुरातत्व विभागाकडे आहेत. तर वेरूळ, अजिंठ्यासह इतर महत्वाच्या वास्तू केंद्र शासनाच्या पुरातत्व विभागाकडे येतात. राज्यातील सुमारे ४९ किल्ले हे राज्य पुरातत्व विभागाच्या अखत्यारित आहेत. तेरचा विचार करता येथील सात टेकड्या १९७५ नंतर राज्य पुरातत्व विभागाकडे आल्याची माहितीही त्यांनी दिली.
तेरमधील बहुसंख्य प्राचीन अवशेष हे सातवाहनकालीन आहेत. महाराष्ट्रात राज्य करणारे पहिले महत्त्वाचे घराणे म्हणजे सातवाहन. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील शुर्पारक (सोपारा), कल्याण, चैमूल्य आदी बंदरातून विविध रोमन बनावटीच्या वस्तू त्या काळी तेर येथे येत होत्या. यामध्ये रोमन नाणी, पुतळ्या, नक्षीदार मडकी, दिवे, ब्रांझचे आरसे आदींचा समावेश होता. तेरहून रोमसह इतर शहरांना मलमल, गोणपाट तसेच कापडाची निर्यात होत होती. रोमबरोबर तेरचा व्यापार कसा होता? कुठे होता? याचे पुरावे उत्खन्ननाच्या माध्यमातून आढळून आलेले आहेत. आता सुरू केलेल्या उत्खन्ननाच्या माध्यमातून सातवाहनपूर्वीच्या काळात जाण्याचा आमचा प्रयत्न आहे. तेव्हाचे मणी, भांडी, अर्धवट जळालेले धान्य, घरांचे अवशेष यावरून त्या काळची आर्थिक स्थिती, लोकजीवन, संस्कृति कशा पद्धतीचे असेल? याचा अभ्यास होतो. याबरोबरच उत्खन्ननाच्या माध्यमातून तेव्हाच्या पर्यावरणासह त्याकाळी पावसाचे प्रमाण कसे असायचे? या बाबीही अभ्यासता येतात. उत्खन्ननावेळी सापडणारी भांडी ही सुद्धा अभ्यासाच्या अनुषंगाने महत्वपूर्ण असतात. इतिहासाच्या अभ्यासातून राजे-राजवाडे, शासन प्रणाली आदींचा परामर्ष घेता येतो. मात्र पुरातत्व विभाग हा हजारो वर्षापूर्वीच्या सामान्य लोकांच्या लोकजीवनाचा अभ्यास करते असे त्या म्हणाल्या.
प्राचीन वास्तूंचे संवर्धन आवश्यक
१९६७ साली विटांच्या भिंतीचे तेर येथे अवशेष आढळून आले होते. अधिक उत्खननानंतर तेथे अर्धगोलाकार चैत्यगृह दिसून आले. त्यामुळे तेरचा इतिहास थेट बुध्दकाळापर्यंत जाऊन पोहंचतो. सम्राट अशोकांनी धम्मरक्षित या बौध्द भिख्खुला तेर येथे पाठविल्याचाही उल्लेख अभ्यासातून पुढे आला आहे. याबरोबरच तेरमध्ये असलेल्या प्राचिन मंदिरांचे महत्त्वही वेगळे आहे. कलात्मक वस्तू आणि वास्तू उभारण्यामध्ये प्राचीन राजवटीची कित्येक शतके गेलेली असतात. त्यामुळे या प्राचीन वास्तूंचे, अवशेषांचे जतन, संवर्धन करणे आपले कर्तव्य आहे. वास्तू रक्षणासाठी स्थानिकांनी पुढाकार घ्यायला हवा. विशेषत: नवी पिढी यासाठी पुढे येण्याची आवश्यकता असल्याचेही डॉ. माया पाटील यांनी सांगितले.