एटीएम केंद्राला लागले कुलूप
By Admin | Updated: June 17, 2014 00:38 IST2014-06-17T00:17:15+5:302014-06-17T00:38:19+5:30
पालम : शहरात गंगाखेड रस्त्यालगत स्टेट बँक आॅफ हैदराबाद या बँकेचे एटीएम केंद्र आहे़ देखभालीअभावी या केंद्राची दुरवस्था झाली आहे़

एटीएम केंद्राला लागले कुलूप
पालम : शहरात गंगाखेड रस्त्यालगत स्टेट बँक आॅफ हैदराबाद या बँकेचे एटीएम केंद्र आहे़ देखभालीअभावी या केंद्राची दुरवस्था झाली आहे़ मागील तीन महिन्यांपासून या एटीएम केंद्राला चक्क कुलूप लागले आहे़ यामुळे ग्राहकांची गैरसोय होत असून, एटीएम केंद्र कुचकामी बनले आहे़
पालम शहरात राष्ट्रीयकृत बँकेचे दोन एटीएम केंद्र आहेत़ स्टेट बँक आॅफ इंडियाचे एटीएम केंद्र बसस्थानक परिसरात असून, सुरळीतपणे चालू आहे़ परंतु, स्टेट बँक आॅफ हैदराबादच्या एटीएम केंद्राची दुरवस्था झाली आहे़ या केंद्राची देखभाल करणारी यंत्रणा कुचकामी बनल्याने नेहमीच हे केंद्र नादुरुस्त असते़ मागील वर्षभरापासून हे एटीएम केंद्र काही ना काही कारणामुळे बंद राहत आहे़ आतापर्यंत या केंद्राच्या ग्राहकांनी अनेकवेळा तक्रारी केल्या आहेत़
परंतु, याचा फारसा परिणाम संबंधित यंत्रणेवर झालेला नाही़ पालम हे तालुक्याचे ठिकाण असून, मोठी बाजारपेठ आहे़ यामुळे एटीएम केंद्र ही ग्राहकांसाठी गरजेची बाब आहे़
पैसे काढण्यासाठी ग्राहक नेहमीच एटीएम केंद्राकडे धाव घेतात़ शहरातील एसबीएच बँकेचे एटीएम केंद्र बंद पडल्याने एसबीआय बँकेच्या एटीएम केंद्रावर पैसे काढण्यासाठी ग्राहकांच्या रांगा लागत आहेत़
या केंद्रातही पैसे संपताच रिकाम्या हाताने ग्राहकांना परतावे लागत आहे़ एसबीएच बँकेचे एटीएम केंद्र बंद राहत असल्याने एटीएम धारकांच्या अडचणीत भर पडत आहे़ सदरील केंद्र हे वर्षभरापासून नेहमीच बंद राहत आहे़ एटीएम केंद्राची देखभाल करणारी यंत्रणा सक्षम नसल्याने हे केंद्र गैरसोयीचे बनले आहे़ तीन महिन्यांपासून या केंद्राला कुलूप लागलेले दिसत आहे़ यामुळे ग्राहकांची तारांबळ उडत आहे़ (प्रतिनिधी)
एटीएम धारकांच्या अडचणीत भर
शहरात आतापर्यंत राष्ट्रीयकृत बँकेचे दोन एटीएम केंद्र कार्यरत आहेत़ यापैकी एसबीआय बँकेच्या एटीएम केंद्रावर ग्राहकांना चांगल्या सेवा मिळत आहेत़ परंतु, एसबीएच बँकेचे केंद्र बंद पडले आहे़
यामुळे एकाच केंद्रावर एटीएम धारकांना जावे लागत आहे़ हे केंद्र बंद पडल्याने ग्राहकांच्या अडचणीत भर पडली आहे़ अनेक वेळा ग्राहकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे़ त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन बंद पडलेले केंद्र सुरळीत करण्याची मागणी होत आहे़
तांत्रिक बिघाड नेहमीचाच
पालम शहरात एसबीएच बँकेचे एटीएम केंद्र वर्षभरापूर्वी पहिल्यांदाच सुरू झाले होते़ यामुळे पालमकरांची गैरसोय दूर होण्यास मदत झाली़
या एटीएम केंद्रावर अगोदर पैसे काढण्यासाठी रांगा लागत होत्या़ परंतु, सदरील केंद्र हे ग्राहकांची डोकेदुखी बनली आहे़
या केंद्रात नेहमीच तांत्रिक बिघाड होऊन मशीन बंद राहत होती़ हे एटीएम केंद्र ग्राहकांच्या सेवेसाठी की गैरसोयीसाठी सुरू करण्यात आले हे न उलगडणारे काडेच आहे़ या केंद्राला कुलूप लागल्याने ग्राहकही फारसे फिरकत नाहीत़