एटीएम कार्डची सुरक्षा ऐरणीवर

By Admin | Updated: June 21, 2014 01:01 IST2014-06-21T00:44:29+5:302014-06-21T01:01:22+5:30

विजय सरवदे, औरंगाबाद बँकेचे अकाऊंट हॅक करून पैसे लांबविण्याचे प्रकार पूर्वी घडायचे. आता मात्र, बँक खातेदारांना फोन करून ‘मी बँक अधिकारी बोलतो’, अशी बतावणी केली जाते व एटीएमचा कोड विचारून परस्पर

ATM Card Security Warning | एटीएम कार्डची सुरक्षा ऐरणीवर

एटीएम कार्डची सुरक्षा ऐरणीवर

विजय सरवदे, औरंगाबाद
बँकेचे अकाऊंट हॅक करून पैसे लांबविण्याचे प्रकार पूर्वी घडायचे. आता मात्र, बँक खातेदारांना फोन करून ‘मी बँक अधिकारी बोलतो’, अशी बतावणी केली जाते व एटीएमचा कोड विचारून परस्पर पैसे लांबविण्याचे प्रकारही सर्रास घडत आहेत. या सहा महिन्यांत अशा तब्बल २६ घटना शहरात घडल्या आहेत. परिणामी, लुबाडणुकीच्या या घटनांमुळे एटीएम कार्डच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
‘आॅन लाईन’ चोरीचे फॅड मोठ्या प्रमाणात वाढले आहे. क्रेडिट, डेबिट अथवा ‘एटीएम’ कार्डचा कोड विचारून परस्पर पैसे काढण्याचे किंवा कधी-कधी आॅनलाईन खरेदीचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत आहेत. या सहा महिन्यांत आतापर्यंत ‘एटीएम’, डेबिट तसेच क्रेडिट कार्डद्वारे फसवणूक केल्याच्या २६ घटना पोलीस आयुक्तालयात ‘सायबर क्राईम सेल’कडे नोंदवण्यात आल्या आहेत. यातील बहुतांश घटनांत बँक खात्याचे व्यवहार तात्काळ थांबवून संबंधिताची संभाव्य फसवणूक रोखण्यात पोलिसांना यश आले असले तरी ‘टेलिफिशिंग अटॅकर्स’ना पकडण्यात मात्र पोलीस अपयशी ठरले आहेत.
बँकांकडे तात्काळ संपर्कासाठी सुविधा असावी
या आठवड्यात एटीएमद्वारे फसवणूक झालेल्या ३ घटना घडल्या आहेत. शिवाजी किसनराव हेकडे (४६, रा. जयभवानीनगर) हे जिल्हा परिषद शाळेवर आडूळ येथे शिक्षक आहेत. त्यांना अगोदर एसबीआय बँकेचा बनावट एसएमएस आला. त्यानंतर लगेच फोन आला. बँकेतून बोलतोय, तुमच्या एटीएमची मुदत संपली असून त्याला रिन्युअल करण्यासाठी पिनकोड विचारून घेतला. हेकडे यांना अवघ्या दहा मिनिटांतच खात्यातून पैसे कपात होत असल्याचे मेसेज येत राहिले. टेलिफिशिंग अ‍ॅटकरने तब्बल ५० हजार रुपयांची आॅनलाईन खरेदी करून हेकडे यांची फसवणूक केली. बुलडाणा येथील एसबीआय बँकेचे खातेदार असलेले प्रकाश प्रभाकर भालेराव (६४, रा. तिरुमला मंगल कार्यालयासमोर) व अशोक अंबादास कुलकर्णी (रा. सिडको एन-८) यांचीही अशाच पद्धतीने फसवणूक झाली. प्रकाश भालेराव म्हणाले, समोरच्या व्यक्तीची भुरळ पडल्यामुळे मी अनावधानाने सगळी माहिती सांगितली आणि माझी फसवणूक झाली. फसवणूक झालेल्या शिवाजीराव हेकडे व प्रकाश भालेराव हे म्हणाले की, अशी घटना घडल्यानंतर खात्यातील पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी बँकेकडे २४ तास फोनची सुविधा असावी. जो टोल फ्री क्रमांक दिलेला आहे, तो नेहमी एंगेज लागतो. दुसरीकडे ‘एटीएम’ कार्डशिवाय खातेदाराच्या खात्यातून पैसे काढण्याची मुभा कोणालाही नसावी; पण चोरटे पैसे काढतातच कसे, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. फसवणूक झालेल्या या तिघा जणांपैकी एकालाही ‘आॅनलाईन’ खरेदीचे ज्ञान नाही, हे विशेष!

एटीएमची फसवणूक कशी होते
बँक अधिकारी बोलतोय, असा फोन करणारी व्यक्ती अगोदार तुमचे नाव सांगते. नंतर तुमचा मोबाईल क्र मांकदेखील सांगते. त्यामुळे समोरच्या व्यक्तीला तो खरोखर बँकेचाच अधिकारी बोलत असल्याची खात्री पटते. एटीएम कार्डची माहिती अपडेट करायची आहे, अशी थाप मारून तो पिनकोडविषयी विचारतो. माहिती न दिल्यास तुमचे एटीएम केव्हाही ब्लॉक होऊ शकते, अशी भीती घालतो. आपण समोरच्या व्यक्तीने विचारलेली माहिती दिली की, तो फोन कट करतो. त्यानंतर थोड्याच वेळात आपल्या खात्यातून पैसे काढल्याचा मॅसेज येतो.

——————
एटीएम कार्डसंदर्भात सूचना
१) एटीएम कार्ड हरविले तर सर्वप्रथम कार्ड नंबर ब्लॉक करण्यासाठी बँकेला कळवा. लेखी स्वरूपात अर्ज करा.
२) एटीएम कार्डवरच टोल फ्री नंबर दिलेला असतो त्यानंबरवर फोन करून कार्ड ब्लॉक करण्यास सांगावे.
३) जर तुम्ही हरवलेल्या एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डची माहिती बँकेला कळविली नाही, तर त्या कार्डचा गैरवापर होऊ शकतो.
४) हरवलेले एटीएम कार्ड ब्लॉक झाल्याची खात्री झाल्यानंतरच दुसऱ्या एटीएम कार्डसाठी अर्ज करा.
५) फोनवर कोणालाही एटीएम कार्ड नंबर किंवा पिन नंबर सांगू नका.
६) स्वत:चे एटीएम कार्ड स्वत:च हातळा.
७) लहान मुलांच्या हातात एटीएम कार्ड देऊ नका.
८) एटीएमवर एटीएम कार्ड नंबर व पिन नंबर टाकताना कोणी त्यावर लक्ष ठेवत नाही ना, याची खात्री करा.
९) कोणी एटीएममध्ये कार्ड गुंतले किंवा पैसे काढण्यासाठी मदत करीत असेल, तर मदत नाकारा.
१०) कार्ड गुंतले किंवा पैसे अडकल्यास बँक अधिकाऱ्याचीच मदत घ्या.
११) व्यवहार पूर्ण झाल्याची सूचना मिळाल्यावरच एटीएममधून बाहेर पडा.
१२) पिन नंबर विसरल्यास बँकेला लेखी स्वरूपात अर्ज करून नवीन पिन नंबर प्राप्त करून घेता येतो.
——————

बँक फोनवर एटीएम नंबर, पिन नंबर मागत नाही
स्टेट बँक आॅफ हैदराबादचे एटीएम चॅनल व्यवस्थापक प्रमोद भेंडे यांनी सांगितले की, कोणतीही बँक फोनवर किंवा एसएमएसद्वारे ग्राहकांना त्यांचा एटीएम कार्ड नंबर व पिन नंबर (पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर) मागत नाही.
यामुळे कोणत्याही बँकेच्या नावाने आपणास कोणी फोन अथवा एसएमएस करून एटीएम कार्ड नंबर किंवा पिन नंबर मागत असेल तर त्यास तो देऊ नका. नागरिक अनोळखी माणसाला सर्रास आपला एटीएम नंबर व पिन नंबर सांगतात. चोर याचाच फायदा घेऊन त्यांच्या खात्यातील रक्कम लंपास करतात.
२५ टक्के तक्रारी एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डच्याच
रिझर्व्ह बँकेच्या अहवालानुसार २०१२-२०१३ मध्ये बँकिंग लोकपालकडे बँकिंग व्यवहारासंदर्भात ७० हजार तक्रारी प्राप्त झाल्या. त्यातील २५ टक्के तक्रारी या एटीएम, डेबिट व क्रेडिट कार्डसंदर्भात होत्या.
पोलिसांना कळवा
सायबर क्राईम सेलचे निरीक्षक गौतम पातारे म्हणाले की, मोबाईलवर बँकेसंबंधी माहिती विचारणारे फोन आले तर समोरच्या व्यक्तीला आपली गोपनीय माहिती देऊ नका. तात्काळ यासंबंधी जवळच्या पोलीस ठाण्याला किंवा सायबर क्राईम सेलकडे संपर्क साधावा.

Web Title: ATM Card Security Warning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.