महापालिका निवडणुकीसाठी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इच्छुक उमेदवारांच्या ‘जोर बैठका’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 03:56 PM2020-02-26T15:56:13+5:302020-02-26T15:59:29+5:30

गुन्हेगारांनी नगरसेवक होण्यासाठी चांगलीच तयारी सुरू केली आहे.

aspirations of criminal tendencies for Aurangabad municipal corporation election | महापालिका निवडणुकीसाठी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इच्छुक उमेदवारांच्या ‘जोर बैठका’

महापालिका निवडणुकीसाठी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इच्छुक उमेदवारांच्या ‘जोर बैठका’

googlenewsNext
ठळक मुद्देमहापालिका निवडणुकीत तिकिटांची मागणी राजकीय पक्षांवर दबाव वाढविणे सुरू

औरंगाबाद : महापालिका निवडणुकीच्या रणसंग्रामात शहरातील काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मंडळींनीही भाग घेण्यासाठी जोर बैठका सुरू केल्या आहेत. विविध राजकीय पक्षांकडून उमेदवारी मिळावी म्हणूनही त्यांनी दबाव वाढविण्यास सुरुवात केली आहे. तडीपार, खुनाचा गुन्हा, १४ वर्षे कारागृहात शिक्षा भोगून आलेल्या, दंगलीचे गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांनी नगरसेवक होण्यासाठी चांगलीच तयारी सुरू केली आहे. कोणकोणते राजकीय पक्ष त्यांना उमेदवारी देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भारतीय घटनेनुसार निवडणूक लढविण्याचा सर्वांना अधिकार दिला आहे. कारागृहात राहूनही निवडणूक लढविण्याची मुभा घटनेने दिली आहे. मागील काही वर्षांमध्ये राजकारणाचा कल गुन्हेगारीकडे वाढू लागला आहे. विविध राजकीय पक्षच सर्वाधिक गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तींना उमेदवारी देत आहेत. औरंगाबाद महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत गंभीर गुन्हे दाखल असलेले काहीजण निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी आपल्या सोयीच्या वॉर्डांवर बोट ठेवत राजकीय पक्षांकडे उमेदवारीची मागणीही करीत आहेत.

सेना, भाजप, काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस, एमआयएम आदी पक्षांकडून ही मंडळी उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न करताना दिसून येत आहेत. काहींनी तर वॉर्डांमध्ये अनधिकृत जाहिरात फलक लावून उमेदवारीची घोषणाही करून टाकली आहे. काही वॉर्डांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मंडळींनी स्वत: उभे न राहता आपल्या कुटुंबातील व्यक्तीला उभे करणार असल्याचा इशारा दिला आहे. वॉर्डांमधील चौकाचौकात या मंडळींच्या जोर बैठका सुरू झाल्या आहेत. राजकीय पक्षांनीही त्यांना उमेदवारी देणार नाही, असे सांगितलेले नाही. वरिष्ठ निर्णय घेतील म्हणून थोपवून ठेवले आहे. राजकीय पक्षांनी उमेदवारी न दिल्यास अपक्ष लढण्याची तयारीही त्यांनी ठेवली आहे. 

राजाबाजार दंगलीतील आरोपी
राजाबाजार दंगलीत पोलिसांनी दोन्ही समाजाच्या वेगवेगळ्या आरोपींना अटक केली होती. आता हे आरोपी स्वत: किंवा कुटुंबातील कोणाला तरी निवडणूक रिंगणात आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. हे आरोपी एमआयएम, सेनेकडे उमेदवारी मागत आहेत.

भाई, भाऊ, दादाकडे सर्वांचे लक्ष 
लुटमार, तडीपार, दंगल,फसवणुकीसह अन्य  गुन्ह्यांतील आरोपी  ‘भाऊ’, ‘दादा’ यांनी महापालिका निवडणूक लढविण्याची तयारी चालविली आहे. ते उमेदवारीसाठी राजकीय पक्षांचे उंबरे झिजवत आहेत. राजकीय पक्ष कुणाला तिकिटे देऊन पावण करणार की ते अपक्षच लढणार, याकडे  लक्ष लागून आहे. 

कारागृहातून बाहेर आल्यानंतर...
सेनेचे एक माजी नगरसेवक १४ वर्षांची शिक्षा भोगून बाहेर आले आहेत. त्यांनीही सेनेकडून उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न सुरू केल्याची चर्चा आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आता बरीच बदलली आहे. त्यामुळे अशा उमेदवारांना उमेदवारी मिळेल किंवा नाही, याची शाश्वती नाही.

राजकीय पक्ष काय करणार?
राजकीय पक्षांनी गुन्हेगार नेत्यांची माहिती प्रकाशित करावी, असे आदेश काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या पार्श्वभूमीवर औरंगाबाद महापालिकेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत राजकीय पक्षांकडून उमेदवारी मिळविण्यासाठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या भाऊ-दादांनी प्रयत्न सुरू केले आहेत. महापालिका वॉर्ड आरक्षण जाहीर झाल्यापासून सर्वच राजकीय पक्षांतील इच्छुक तयारीला लागले आहेत. यात गुंडप्रवृत्तींच्या लोकांचाही सहभाग लक्षणीय आहे. मोठ्या पक्षाच्या तिकिटासाठी आता ही मंडळी राजकीय कार्यक्रमातून दिसू लागली आहे. गतवर्षी झालेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत दिलेल्या योगदानामुळे पक्ष नेतृत्वाने अनेकांना महापालिकेच्या उमेदवारीचे आश्वासन दिले आहे. यामुळे काही अति आत्मविश्वासूंनी चौकाचौकात होर्डिंग उभारणी आरंभली आहे. शहरातून दोनदा तडीपार आणि सुमारे २२ गुन्ह्यांचा शिरावर डोंगर असलेल्या गुन्हेगाराने प्रबळ पक्षाकडून सातारा परिसरात निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली. या गुंडास पक्ष अधिकृत उमेदवारी देणार का, हे काळाच्या उदरात लपलेले गुपित आहे. दरोड्याच्या गुन्ह्यात काही वर्षांपूर्वी कारागृहात मुक्कामी राहिलेल्या एकाने मुकुंदवाडी परिसरातून पतंग उडविण्याचे मनात मांडे रचले आहेत.


चारित्र्य प्रमाणपत्रासाठी पोलिसांकडे धाव
उमेदवारी अर्जात स्वत:विरुद्ध दाखल गुन्ह्यांची माहिती द्यावी लागते. यामुळे स्वयंघोषित उमेदवारांनी पोलीस आयुक्तालय आणि पोलीस ठाण्यांकडे चारित्र्य प्रमाणपत्रासाठी अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली आहे. काहींनी तर येथेही बाजी मारत दोन महिन्यांपूर्वीच चारित्र्य प्रमाणपत्र पदरी पाडून घेतले आहे. 

Web Title: aspirations of criminal tendencies for Aurangabad municipal corporation election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.