अपघात होताच आरटीओ अधिकाऱ्यांनी पळ काढला, ट्रकमध्ये लायसन्स फेकले अन् अडकले
By सुमित डोळे | Updated: October 20, 2023 12:35 IST2023-10-20T12:28:24+5:302023-10-20T12:35:46+5:30
पोलिस तपासात आरटीओ अधिकाऱ्यांची गंभीर बाब समोर, एकाच वेळी दोन ट्रक थांबवले, म्हणून दोघांना समोर नेले

अपघात होताच आरटीओ अधिकाऱ्यांनी पळ काढला, ट्रकमध्ये लायसन्स फेकले अन् अडकले
छत्रपती संभाजीनगर : वैजापूर जवळ शनिवारी मध्यरात्री समृद्धी महामार्गावरील आरटीओ अधिकाऱ्यांनी थांबवलेल्या ट्रकला भाविकांचा टेम्पो धडकून भीषण अपघात झाला. यात १३ प्रवाशांचा मृत्यू झाला. हा अपघात होताच आरटीओ अधिकाऱ्यांनी मदतीचे नाटक केले. त्यानंतर ट्रकचालकाचे घेतलेले कागदपत्रे ट्रकमध्ये फेकत पळ काढला. मात्र, अपघातग्रस्त ट्रकचालकाचे कागद फेकण्याऐवजी दुसऱ्याच चालकाचे लायसन्स फेकले गेले. पोलिस तपासात नेमके ते पकडले गेले व आरटीओ अधिकाऱ्यांच्या चुकीचा सबळ पुरावाच पोलिसांना मिळाला. पोलिसांची ही बाब रेकॉर्डवर घेतल्याने त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरील हडसपिंपळगाव टोलनाक्याच्या पुढे टेम्पो ट्रॅव्हल्स व ट्रकचा भीषण अपघात झाला. यात एकूण १३ प्रवाशांचा मृत्यू तर २२ प्रवासी जखमी आहेत. सैलानी बाबांचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांचा टेम्पो ट्रॅव्हलर सावंगी टोल नाक्यावरून समृद्धी महामार्गावर चढला व ८० किमी वेग मर्यादेच्या लेनद्वारे पुढे निघाला. यावेळी हडसपिंपळगाव टोलनाक्यासमोर १२० वेग मर्यादेच्या लेनमध्ये ट्रक जात होता. परंतु त्याला आरटीओ अधिकाऱ्यांनी वाहनातूनच ट्रक बाजूला घेऊन थांबण्याचा इशारा केल्याने ट्रकचालकाने ट्रक थेट ८० किमीच्या लेनमध्ये वळवला व मागून जात असलेली टेम्पो ट्रॅव्हलर त्यावर वेगात जाऊन धडकली.
एक नाही, दोन ट्रक थांबवले
मध्य प्रदेशच्या ट्रकला सहायक मोटार वाहन निरीक्षक प्रदीप राठोड, नितीन गोणारकर यांनी आधी थांबवून कागदपत्रे घेतली. त्यानंतर राजस्थानच्या एका ट्रकच्या मागे जात थांबण्याचा इशारा केला. मध्य प्रदेशच्या ट्रकचालकाचे कागदपत्रे घेऊन आरटीओ चालल्या गेले. ट्रक चालक त्यांच्या मागे जात असताना टोल नाक्यापासून काही अंतरावर अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून चालकाने ट्रक बाजूला घेतला आणि मागून टेम्पो ट्रॅव्हलर येऊन धडकला. अपघात होताच आरटीओ अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मदतीचे नाटक केले. मात्र, पोलिस येत असल्याचे दिसताच हातातील कागदपत्रे ट्रकमध्ये फेकून धूम ठोकली. थेाड्या वेळाने पुन्हा येत नामानिराळे राहण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी कागदपत्रे तपासली असता ट्रकमध्ये फेकलेले लायसन्स तिसऱ्याच व्यक्तीचे निघाले. चालकाने ते अधिकारी फेकून गेल्याचा जबाब दिला.