मनपासाठी महायुतीत लढा, असे बावनकुळे म्हणताच भाजपमधील इच्छुकांचे अवसान गळाले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 20:09 IST2025-12-18T20:08:16+5:302025-12-18T20:09:04+5:30
शिंदेसेनेचा भाजपवर दबाव : २०१५ च्या फाॅर्म्युल्यानुसार जागा वाटप करा

मनपासाठी महायुतीत लढा, असे बावनकुळे म्हणताच भाजपमधील इच्छुकांचे अवसान गळाले
छत्रपती संभाजीनगर : भाजपचे नेते तथा राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महायुतीतच महापालिका निवडणुका लढवायच्या आहेत. कुणीही वादंग करण्याची भूमिका घेऊ नका, अशी समज स्थानिक कोअर कमिटीला बुधवारी भाजपच्या चिकलठाणा येथील विभागीय कार्यालयातील आढावा बैठकीत दिल्यानंतर महापालिका निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या अनेकांचे अवसान गळालेच, शिवाय कोअर कमिटीही अस्वस्थ झाली.
२०१५ च्या फाॅर्म्युल्यानुसार जागा वाटप करावे, त्यानंतर उरलेल्या जागा फिप्टी-फिप्टी वाटून घेण्याचा प्रस्ताव शिंदेसेनेने ठेवल्यामुळे भाजपात अस्वस्थता आहे. महायुतीमध्ये मोठा भाऊ कोण ? याचा विचार जागा वाटपाच्या बैठकीत होणार आहे. महायुती करण्याच्या वरिष्ठांच्या सूचनेमुळे भाजपमधील अनेक इच्छुकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
२९ पैकी १८ प्रभागांमध्ये महायुतीसाठी पोषक वातावरण आहे. या प्रभागांमध्ये फिप्टी-फिप्टी जागा वाटप झाले, तर ३६ जागा भाजपच्या व ३६ जागा शिंदेसेनेच्या वाट्याला येतील. या दोन्ही पक्षांनी अजित पवार गट आणि रिपाइं गटाचा विचार अद्याप केलेला नाही.
तर होईल तारेवरची कसरत....
१८ प्रभागांमध्ये (७२ वॉर्ड) महायुतीतील शिवसेना (शिंदेसेना) आणि भाजपमध्ये प्रचंड स्पर्धा आहे. उर्वरित ११ प्रभागांमध्ये (म्हणजेच ४४) मुस्लिमबहुल मतदार असल्यामुळे दोन्ही पक्षांकडे ताकदीचे उमेदवार नाहीत. पाच वर्षांपासून निवडणुका झालेल्या नसल्यामुळे सगळ्यांनाच भाग्य आजमावयाचे आहे. त्यामुळे महायुती करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत उमेदवारांची संख्या वाढल्यामुळे कुठेही युती झाली नाही. तोच प्रकार मनपा निवडणुकीत होण्याची शक्यता भाजपच्या एका नेत्याने वर्तविली.
युती झाल्यास काय होणार....
भाजप, शिंदेसेनेसह घटक पक्षांची युती झाल्यास भाजप व शिंदेसेनेमधील अनेक इच्छुकांचा बळी जाणार हे निश्चित आहे. पूर्व मतदारसंघात १०, पश्चिम मतदारसंघात आठ व मध्य मतदारसंघात नऊ, तर फुलंब्री मतदारसंघात २ मिळून २९ प्रभाग आहेत. या सर्व प्रभागांमध्ये सेना-भाजपकडे इच्छुकांची मोठी यादी आहे. दोन्ही पक्षांकडे सुमारे २२०० अर्ज आले आहेत. युती झाल्यास वाट्याला येणाऱ्या प्रभागानुसार ज्यांना उमेदवारी मिळणार नाही, ते बंडखोरी करतील, अथवा आघाडीत जातील, अशी भीती सेना-भाजपला आहे.
अजून काही बैठका होतील
महायुतीमध्ये निवडणुका लढवाव्यात असे मंत्री बावनकुळे यांनी आज सूचना केल्या आहेत. त्यानुसार कोअर कमिटीने प्राथमिक चर्चा केली आहे. अजून काही बैठका होतील, त्यानंतर पुढील निर्णय घेऊ.
- शिरीष बोराळकर, कोअर कमिटी सदस्य.
पक्षाची भूमिका महत्वाची
महायुतीमध्ये निवडणूक लढण्याची पक्षाची भूमिका आहे. कुणीही वादंग हाेईल, असे निर्णय घ्यायचे नाहीत, असे मंत्री बावनकुळे यांनी बुधवारच्या बैठकीत सांगितले.
- समीर राजूरकर, निवडणूक प्रमुख
परिस्थिती बदललेली आहे
२०१५ चा विषय आता संपलेला आहे. सर्व परिस्थिती बदललेली असून, ‘नया भिडू नया राज’ या पद्धतीने जागा वाटपाचा विचार करावा, त्यानुसार महायुतीचा विचार झाला पाहिजे.
- बापू घडमोडे, माजी महापौर.