सिल्लोडच्या खंडहर क्वॉर्टरमध्ये तब्बल ५११ मतदार; किरिट सोमय्यांची निवडणूक विभागाकडे तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 14:37 IST2025-10-29T14:35:35+5:302025-10-29T14:37:48+5:30
शिवसेनेच्या दबावात प्रशासनाने एका वॉर्डात इतर वॉर्डांतील नावे घुसवल्याचा किरीट सोमय्या यांचा आरोप

सिल्लोडच्या खंडहर क्वॉर्टरमध्ये तब्बल ५११ मतदार; किरिट सोमय्यांची निवडणूक विभागाकडे तक्रार
- श्यामकुमार पुरे
सिल्लोड : सिल्लोड नगर परिषदेने जाहीर केलेल्या प्रारूप मतदार यादीत पंचायत समितीच्या चार क्वाॅर्टरच्या पत्त्यावर तब्बल ५११ मतदार दाखवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे हे चारही क्वाॅर्टर गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहेत. या क्वाॅर्टरमधील मतदारांची पाहणी करण्यासाठी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या सोमवारी सिल्लोड येथे आले होते. शिवसेनेच्या दबावात प्रशासनाने एका वॉर्डात इतर वॉर्डांतील नावे घुसवल्याचा आरोप त्यांनी केला.
सिल्लोड पंचायत समितीच्या बंद असलेल्या चार क्वाॅर्टरमध्ये ५११ मतदार असल्याची माहिती मिळाल्यानंतर किरीट सोमय्या त्याची पाहणी करून तक्रार देण्यासाठी सोमवारी सिल्लोडमध्ये आले होते. दुपारी दोन वाजता त्यांनी क्वाॅर्टरची पाहणी केली. यानंतर उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण यांच्याकडे तक्रार केली. प्रभाग क्रमांक आठमध्ये असलेल्या पं.स. क्वाॅर्टरमध्ये इतर प्रभागांतील विशिष्ट समाजाच्या ५११ मतदारांची नावे दाखवण्यात आली आहेत. ती पुन्हा त्यांच्या प्रभाग यादीमध्ये सामाविष्ट करावी, अशी मागणी सोमया यांनी केली. यावेळी भाजप प्रदेश सचिव सुरेश बनकर, किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस मकरंद कोर्डे, जिल्हा उपाध्यक्ष सुनील मिरकर, जिल्हा सचिव कमलेश कटारीया, मंडळाध्यक्ष मनोज मोरेल्लू, माजी नगरसेवक विष्णू काटकर उपस्थित होते.
काय आहे प्रकरण?
सिल्लोड शहरातील शाश्री कॉलनीच्या प्रभाग क्रमांक आठच्या भाग क्रमांक ३६४-१ पंचायत समिती क्वाॅर्टरमध्ये २८३२ ते ३३४३ क्रमांकापर्यंत मतदार यादीत ५११ नवीन आणि बोगस मतदारांची नावे घुसवल्याचा आरोप आहे. दरम्यान, प्रशासन मतदार याद्यांतील आक्षेप आणि आरोपांवर काय कार्यवाही करते, हे ३१ ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यावर स्पष्ट होईल.
साेमय्यांची वर्षभरात पाचवी सिल्लोड वारी
सोमय्या यांची वर्षभरातील सिल्लोडची पाचवी भेट आहे. विधानसभा निवडणुकीनंतर न. प. व उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत अनेक लोकांना कोणतेही कागदपत्रांचे पुरावे न बघता जन्म प्रमाणपत्र दिल्याचा, त्या दाखल्यांआधारे सिल्लोड शहरात व तालुक्यात राहत नसलेल्या ४ हजार ४०० लोकांची नावे मतदार यादीत आल्याचा आरोप केला होता. आता याद्यांतील मतदारांच्या हेराफेरीचा आरोप करत उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले.