छत्रपती संभाजीनगरात महिलांच्या नावावर तब्बल ३२६ दारू दुकाने, मात्र कारभारी पुरुषच

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 13:51 IST2025-08-19T13:47:14+5:302025-08-19T13:51:14+5:30

दारू धंद्याचा नफा पुरुषांचा, पण कायदेशीर जबाबदारी महिलांच्या नावावर ढकलली; छत्रपती संभाजीनगरात मद्यविक्रीत २६.६ टक्के महिलांचे वर्चस्व

As many as 326 liquor shops in the name of women in Chhatrapati Sambhaji Nagar | छत्रपती संभाजीनगरात महिलांच्या नावावर तब्बल ३२६ दारू दुकाने, मात्र कारभारी पुरुषच

छत्रपती संभाजीनगरात महिलांच्या नावावर तब्बल ३२६ दारू दुकाने, मात्र कारभारी पुरुषच

- प्राची पाटील
छत्रपती संभाजीनगर :
महिला व्यावसायिकतेमध्ये मद्यविक्री क्षेत्र सध्या चर्चेचा विषय ठरले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकूण १२२६ मद्य परवाने आहेत. ज्यामध्ये ३२६ परवाने महिलांच्या नावावर आहेत. म्हणजेच इतक्या महिलांकडे दारू विक्रीसाठीच्या दुकानांचे परवाने आहेत. यात बीअर शॉपमध्ये २२%, वाइन शॉपमध्ये ४६%, देशी दारू दुकानांत ३६%, तर परवाना कक्षात २५% परवाने महिलांच्या नावावर आहेत. एकूणच, महिलांचे मद्यविक्री क्षेत्रात २६.६ टक्के वर्चस्व आहे.

पारंपरिकरीत्या पुरुषप्रधान समजल्या जाणाऱ्या या व्यवसायात महिलांची नोंदणी वाढली असली, तरी प्रत्यक्ष परिस्थिती वेगळी आहे. परवाने महिलांच्या नावाने असले तरी दुकानाचा कारभार, खरेदी-विक्रीपासून ते आर्थिक व्यवहारापर्यंत सर्व काही पुरुषांकडूनच पाहिले जाते. परवाने केवळ महिलांच्या नावावर आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार परवाने काढताना ज्या अटींची पूर्तता करावी लागते त्यातून पळवाट काढण्यासाठी कुटुंबातील महिलेच्या नावावर परवाने काढले जातात.

काय आहेत कारणे?
तज्ज्ञांच्या मते, मद्यविक्री परवान्यांसाठी काही शासकीय धोरणे, स्थानिक निकष किंवा स्पर्धेतून वाचण्यासाठी परवाने महिलांच्या नावाने घेण्याकडे कल वाढला आहे. कुटुंबातील पुरुषच व्यवसाय चालवतात; पण कायदेशीर सोयीसाठी परवाना महिलांच्या नावावर केला जातो.

नैतिक वाद कायम
मद्यविक्री व्यवसायाबाबत समाजात मतभेद कायम आहेत. एका बाजूला तो नफ्याचा व्यवसाय मानला जातो, तर दुसऱ्या बाजूला त्याचे सामाजिक दुष्परिणामही आहेत. या पार्श्वभूमीवर महिलांच्या नावाने वाढत चाललेल्या परवान्यांकडे अनेकांचे लक्ष वेधले गेले आहे.

आकडेवारी (उत्पादन शुल्क)
१) बीअर शॉप - एकूण- १०८ महिला- २४
२) वाइन शॉप- एकूण- ३९ महिला- १८
३) देशी- एकूण- १४७ महिला- ५३
४) परमिट रूम- एकूण- ९३२ महिला- २३१

महिला सक्षमीकरणात दारूची अडचण
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावावर मद्य परवाना असल्याचा मुद्दा विधानसभेत गाजला होता. महिलांच्या नावावर परवाने काढताना योजना, सबसिडी नसतात. मात्र, आर्थिक व्यवहार, काळा पैसा या कारणांमुळे परवाने काढले जातात. महिला आणि दारू हे विरोधी शब्द आहेत. महिलांचा छळ दारूमुळेच होतो. महिला सक्षमीकरणात दारू मोठी अडचण आहे. व्यवसाय पुरुषांनी करायचे आणि परवाने महिलांच्या नावाने काढायचे, हे चुकीचे आहे. सरकारने याबाबत धोरणात्मक निर्णय घ्यावा. हे परवाने महिलांच्या नावावर असूच नये. स्त्री-पुरुष समानतेचा आग्रह कुठेही धरण्यात अर्थ नाही.
-हेरंब कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्ते

Web Title: As many as 326 liquor shops in the name of women in Chhatrapati Sambhaji Nagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.