औरंगाबादेत स्पर्धा परीक्षांमुळे कला शाखेस झळाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 13:40 IST2018-06-25T13:39:22+5:302018-06-25T13:40:49+5:30
सर्वात कमी गुण मिळाल्यास कला शाखेला प्रवेश घेतला जातो. असा सर्वसाधारणपणे समज असतो. मात्र प्रशासनात अधिकारी होण्याच्या क्रेझमुळे हा ट्रेंड बदलत चालल्याचा प्रत्यय सध्या सुरू असलेल्या प्रवेश प्रक्रियेत येत आहे.

औरंगाबादेत स्पर्धा परीक्षांमुळे कला शाखेस झळाळी
औरंगाबाद : सर्वात कमी गुण मिळाल्यास कला शाखेला प्रवेश घेतला जातो. असा सर्वसाधारणपणे समज असतो. मात्र प्रशासनात अधिकारी होण्याच्या क्रेझमुळे हा ट्रेंड बदलत चालल्याचा प्रत्यय सध्या सुरू असलेल्या प्रवेश प्रक्रियेत येत आहे. दहावीत ९० टक्के आणि बारावीत ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविलेले विद्यार्थीकला शाखेला प्रवेश घेत आहेत. यामागे स्पर्धा परीक्षांची तयारी असल्याचे मत प्रवेश प्रक्रियेत सहभागी असलेल्या प्राध्यापक, प्राचार्यांनी व्यक्त केले.
दहावीत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना विचारले असता, त्यांचा पहिला पसंतीक्रम हा वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचा असतो. त्यानंतर अभियांत्रिकी, इतर व्यावसायिक अभ्यासक्रम, वाणिज्य असा राहतो. सर्वात शेवटी कला शाखेचा विचार होतो. मात्र स्पर्धा परीक्षांची वाढलेली क्रेझ आणि त्यासाठी होणारी स्पर्धा लक्षात घेता विद्यार्थ्यांनी कला शाखेला पसंती देणे सुरू केले आहे. यात कला शाखेच्या पदवी अभ्यासक्रमाला १२ वीत विज्ञान, वाणिज्य शाखेला ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.
प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी इंग्रजी, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास आणि समाजशास्त्र या विषयांना सर्वाधिक प्राधान्य दिले. या विषयांचा फायदा एमपीएससी, यूपीएससीच्या विविध परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात होतो. तसेच या स्पर्धा परीक्षेचा बदललेल्या अभ्यासक्रमांमध्ये याच विषयांना सर्वाधिक प्राधान्य देण्यात आल्यामुळे ज्यांना अधिकारी बनायचे आहे. त्यांचा ओढा याकडे अधिक असल्याचे निरीक्षण देवगिरीचे उपप्राचार्य डॉ. दिलीप खैरनार यांनी नोंदविले. याच वेळी दहावीत ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांनी अकरावी कला शाखेला प्राधान्य दिले आहे. यातही अकरावीत कला शाखेत इंग्रजी माध्यमाचा प्रतिसाद मोठा असल्याचे मत स.भु. कला व वाणिज्य महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. संजय गायकवाड यांनी व्यक्त केले.
स्पर्धा परीक्षांची तयारी हेच कारण
विज्ञान, वाणिज्य शाखेत उच्च माध्यमिक शिक्षण घेऊन ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण घेणारे विद्यार्थी पदवी अभ्यासक्रमात कला शाखेला प्राधान्य देत आहेत. इंग्रजी, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र आणि इतिहास विषयाची निवड करीत आहेत. यामागे स्पर्धा परीक्षांची तयारी हेच कारण आहे.
- डॉ. दिलीप खैरनार, उपप्राचार्य, देवगिरी महाविद्यालय
गुणवंत विद्यार्थी ठरवून कला शाखेत
अकरावी कला शाखेला ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण घेतलेले विद्यार्थी प्राधान्य देत आहेत. यात कला शाखेत प्रवेश घेताना विद्यार्थी इंग्रजी माध्यमाची निवड करीत आहे. यामागे विद्यार्थ्यांची भावना ही इंग्रजी अवघड वाटू नये. इंग्रजी माध्यमाविषयी असणारी भीती दूर व्हावी आणि आगामी शिक्षणात कोठेही इंग्रजीचा अडसर निर्माण होऊ नये, अशी आहे. यामुळे गुणवंत विद्यार्थी ठरवून कला शाखेला प्राधान्य देत आहेत.
- प्रा. संजय गायकवाड, उपप्राचार्य, उच्च माध्यमिक, स. भु. कला महाविद्यालय
आवड जपण्याचा प्रयत्न
अकरावी कला शाखेतील इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला आहे. माझी आवड असणाऱ्या विषयात पुढे उच्चशिक्षण घेता यावे, यासाठी ही निवड केली. माझ्या आवडीच्या क्षेत्रात जाण्यासाठी आई-वडिलांनी प्रोत्साहन दिले. त्यांनी मेडिकल, इंजिनिअरिंगसाठी प्राधान्यक्रम तर दिला नाही, उलट माझी आवड जपण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मी कला शाखेची निवड केली आहे.
- गायत्री कुलकर्णी, विद्यार्थिनी (दहावीत ९४ टक्के गुण)